Site icon लोकाशा-बंब न्यूज

पैसे घेतल्याशिवाय भ्रष्ट अधिकार्‍यांचा हात हलेना ! ‘आधी थोडे तरी पैसे द्या मग कामाचे बोला’, पैसे घेताना जिल्हा परिषदेमधील लाचखोर लेखाधिकारी कॅमेर्‍यात कैद, लेखाधिकार्‍याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्हा प्रशासनात उडाली खळबळ


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार कशा प्रकारे सुरू आहे, याचे जिवंत उदाहरण बीड जिल्हा परिषदेत पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखाअधिकारी अ.व.बुरंडे यांनी पैसे घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून कारवाईची मागणी केली जात आहे.
गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या फाईल पुढे सरकण्यासाठी अधिकारी सर्रास टेबल वरती पैशाची मागणी करतात व ते पैसे स्वीकारताना देखील दिसून येत आहेत. त्यामुळे नेमकं बीड जिल्ह्यामध्ये फाईलवर वजन ठेवल्याशिवाय कुठली फाईल पुढे सरकत नसल्याचे बोलले जात आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखाअधिकारी बुरंडे यांचा प्रताप समोर आला आहे. बुरंडे काम करत असताना एक व्यक्ती टेबलवर पैसे ठेवतो. फाईलवर पैसे ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, काही तरी द्यावं लागतं, असं म्हणत पैसे खिश्यात घातले. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद झाला आहे. एकूणच बीड जिल्हा परिषदेमधील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून यासंदर्भात माध्यमांनी लेखाधिकारी बुरांडे यांना विचारले असता ‘मी कधी कोणाकडून पैसे घेतले आहेत मला आठवत नाही, मात्र माझा खाजगी व्यवहार असू शकतो’, असं फोनवरून सांगितलं. एकंदरीतच भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या या सर्व कार्यालयामध्ये अशा भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई केली, जावी अशी मागणी होत आहे.

टक्केवारीखोर अधिकार्‍यांना कायमचा धडा
शिकवावा
बीडच्या जिल्हा परिषदेमध्ये असे अनेक अधिकारी आहेत की ते पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाहीत, हे सातत्याने उघडकीस आलेले आहे. त्यामुळे अशा टक्केवारीखोर अधिकार्‍यांना सीईओंनी कायमचा धडा शिकवावा, अशीही मागणी होत आहे.

Exit mobile version