Site icon लोकाशा-बंब न्यूज

हा रस्ता केंद्र सरकारचा, अरे फुकटचे श्रेय घेता कशाला ? गेवराईतील 14 कोटींच्या रस्त्याचे उद्घाटन करून खा. प्रीतमताईंनी विरोधकांना लगावले टोले, ..तर आ. लक्ष्मण पवार म्हणाले, रस्त्याचे काम उभे राहून करून घेणार


गेवराई, दि. 16 (लोकाशा न्यूज) : अरे..! फुकटचे श्रेय घेता कशाला, 14 कोटी रुपये खर्च करून सुरू होत असलेला आणि मोदी साहेबांच्या केंद्र सरकारचा हा रस्ता आहे. पाठपुरावा आमदार लक्ष्मण पवार यांनी केला आणि त्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न केले आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी येथे बोलताना केले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत 14 कोटी 39 लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्याचे उद्घाटन शनिवारी (ता. 16 रोजी) करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आमदार लक्ष्मण पवार, सरपंच सूर्यकांत शिंदे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, रामराव खेडकर, पांडुरंग थडके, भाजपा तालुकाध्यक्ष सुरवसे काका, ज्ञानेश्वर खाडे, पुंड यांची उपस्थिती होती. त्या म्हणाल्या की, आयुष्यात कधी कुणाकडून पैसा घेतला नाही. आजही बीड जिल्ह्यातील विविध कामांचे उद्घाटन सुरू आहेत. मात्र, तो पैसा पंकजाताईंचा आहे. हे सूर्य प्रकाशाएवढे सत्य आहे. ज्यांना नारळ फोडायचे त्यांना फोडू द्या, ज्याचे घर आहे तेच वास्तू शांती घालतील. नसता उद्योग कशाला उगाच करायलाय, आयत्या बिळात नागोबा. असा टोला खा. प्रितमताई मुंडे यांनी लगावला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

रस्त्याचे काम उभे राहून करून घेणार : आ. लक्ष्मण पवार
तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यामुळे मतदारसंघातील रस्त्याची दर्जेदार कामे झाली. रस्त्याची कामे करायची म्हणजे कसरत असते. फुकटचे श्रेय घ्यायला काय जाते. ही विकृत प्रवृत्ती आहे. ती पंडितामध्ये आहे. लोक हुशार आहेत. त्यांना फार काही सांगायची गरज नाही. आ. पवार रस्ता दर्जेदार होणार, तो करून घेणार. तुमचे ही लक्ष असू द्या, लोकांनी निवडणुकीत इतक्या वेळा ज्याला आपटी दिली तरी सुद्धा हे पंडित टक्केवारीत अडकलेत. पंडितांची ही विकृती आहे, असेही आ. लक्ष्मण पवार यांनी यावेळी म्हटले.

Exit mobile version