बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : बीड शहरात व मतदार संघात आ.संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मंजुर असून ते प्रगतीपथावर आहेत. अनेक ठिकाणी कामांना सुरूवात होवून ते पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत परंतू काही कामे थोडीशी किचकट असल्याने व ते दर्जेदारच व्हावे यावर भर दिल्याने सदरील विकास कामांना वेळ लागत आहे. यावर वारंवार विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतू बीड शहराचा व मतदार संघाचा विकास हा दर्जेदार होणार असल्याने जनतेच्या मनामध्ये मात्र हा विश्वास ठाम आहे. शहरातील जालना रोडचे काम सुरू आहे, शहरातील रस्त्यांची कायापालट होवू लागली आहे. बीड शहर प्रगतीकडे जातांना दिसत आहे परंतू विरोधकांना हा होणारा विकास सहन होत नाही म्हणून चालू कामात खोडा आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जातात. परंतू हे प्रयत्न कायम विफल ठरले आहेत आणि ठरणारही आहेत. कारण जनतेला बरे आणि वाईट, सत्य आणि असत्य, प्रामाणिक प्रयत्न आणि या प्रयत्नांमध्ये बाधा आण्याचा प्रयत्न बरोबर लक्षात येतो. त्यामुळे विरोधकांनी कितीही अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरी जनता सदैव विकासाच्या म्हणजे आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठिशी उभी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे यांनी केले.
मागील दोन वर्षे कोरोनाच्या काळामध्ये विकास कामांवर प्रत्यक्षात भर देता आला नाही. कारण संपुर्ण जग या काळामध्ये केवळ जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत होते. परंतु अशा आणीबाणीच्या परिस्थितीतही मतदार संघाच्या विकासासाठी आ.क्षीरसागरांकडून सातत्याने पाठपुरावा होत राहिला. बीड मतदार संघाच्या विकासासाठी आ.क्षीरसागरांनी पुर्ण ताकद लावून निधी खेचून आणला यामध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांचेही मोठे योगदान आहे. जो विकास बीड शहराला मागील तीस वर्षात पहायला मिळाला नव्हता त्या विकासाची स्वप्न सत्यात उतरतांना सध्या दिसत आहे. बीड शहर विकासाच्यादृष्टीने परीपुर्ण होणार आहे. यासाठी नियोजन आखले गेले आहे. या नियोजनावर अंमल सुरू आहे. सध्या बीड शहरातील बायपास टू बायपास सिमेंट रस्त्याचे दर्जेदार काम सुरू आहे. हा रस्ता शहरात येणार्या दोन्ही बाजुंचा मुख्य प्रवेश रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यावरून बीड शहरामध्ये प्रवेश होतो. या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षापासून अक्षरश: चाळण झाली होती. याकडे कोणालाही लक्ष देता आले नाही. जनता त्रस्त होती मात्र दखल घेता आली नाही. आता मात्र काम सुरू झाल्यानंतर पाहणी करण्याचा मुलभूत अधिकार जनतेला आहे. परंतू विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी जनतेला विकास चांगलाच कळतो आणि जनता विकासाच्या पाठीमागे राहते. बीड शहरातील या मुख्य रस्त्याचे काम अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण असणार आहे. बीडकरांना अभिमान वाटेल असा अभूतपुर्व विकास करून दाखवणार असा ध्यास आ.क्षीरसागरांनी घेतला असून मतदार संघातील मंजुर विकास कामांना वेळ जरी लागत असला तरी ही कामे परिपूर्ण आणि दर्जेदारच असतील अशी भूमिका आ.संदीप क्षीरसागरांची असून ती कायम राहिल व सर्व विकास कामे लवकरच पुर्ण करण्याचा प्रयत्न करू असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड तालुकाध्यक्ष महादेव उबाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शहरातील रस्ता होणार महानगराचा’
शहरातील बायपास टू बायपास रस्त्याचे काम सुरू असून काम पुर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजुला नाली बांधली जाणार आहे. मुरूम टाकून पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. तसेच ड्रेनेज तयार करण्यात येणार आहेत. रस्त्याच्याकडेला असणार्या विद्युत पोल शिफ्ट करून रस्त्याचे अत्यंत चांगल्या दर्जाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या महामार्गाचे काम अतिशय काटेकोरपणे नियमाच्या अधीन राहूनच केले जात आहे. बीड शहरातील रस्त्यांना तंतोतंत महानगरातील रस्त्याचे स्वरूप येणार आहे.