Site icon लोकाशा-बंब न्यूज

ओबीसी, भटके विमुक्त प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय,महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे शिष्टमंडळ पंकजाताई मुंडेंना भेटले,सरकारकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची पंकजाताईंची ग्वाही

मुंबई ।दिनांक ३०।
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि वि.मा. प्र. या प्रवर्गातील पीएच.डी. करणाऱ्या संशोधकांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती-२०२१ या योजनेद्वारा फेलोशिप मिळण्याबाबत राज्य सरकारकडून अन्याय होत आहे. सारथी आणि बार्टीच्या धर्तीवर फेलोशिप मिळावी यासाठी संघर्ष करणा-या पीएचडी धारक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. पंकजाताईंनी लगेच याची दखल घेत सरकार दरबारी मागणीचा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

सदर प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना ३१ हजार रूपये फेलोशिप देण्याचे सरकारने जाहीर केले होते, तशी जाहिरातही दिली होती पण आता केवळ २१ हजार रूपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाज्योती या संस्थेच्या माहितीपत्रकात नमूद केल्यानुसार, सारथी आणि बार्टी या संस्थेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, वि.जा. भ.ज. आणि वि.मा.प्र. या प्रवर्गातील लाभार्थी वर्गाला लाभ देण्यासाठी महाज्योती ही संस्था कंपनी कायद्याद्वारा स्थापन करण्यात आली आहे. सारथी आणि बार्टी या संस्था पीएच.डी. फेलोशिप देताना यूजीसी या केंद्रीय संस्थेच्या फेलोशिप नियमांना केंद्रस्थानी मानत योजनेचे नियम ठरविलेले असताना महाज्योती मात्र स्वायत्तेच्या नावाखाली वेळपरत्त्वे भूमिका बदलत नियमांची पायमल्ली करत असल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. महाज्योती या संस्थेने देखील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती २०२१ या योजनेमध्ये निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना यूजीसी, सारथी आणि बार्टी यांच्या पीएच.डी. फेलोशिप संदर्भात प्रचलित नियमानुसार फेलोशिप प्रदान करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये सर्व निवड झालेल्या उमेदवारांना यूजीसी, सारथी आणि बार्टी यांच्या प्रचलित नियमानुसार अधिछात्रवृत्ती व इतर सर्व देय भत्ते प्रदान करावे आणि उमेदवारांच्या पीएच.डी. नोंदणी दिनांकापासून ही रक्कम देण्यात लाभार्थी यांना अदा करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

पंकजाताईंना विद्यार्थ्यी भेटले

फेलोशिप संदर्भात लढा देणाऱ्या महाज्योती विद्यार्थ्यी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. पंकजाताईंनी त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेत लगेच ना. विजय वडेट्टीवार यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. आपण यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष नितीन आंधळे यांचेसह पीएचडी धारक विद्यार्थ्यी सहभागी होते.
••••

Exit mobile version