Site icon लोकाशा-बंब न्यूज

भावंडाना वाचविण्यासाठी तरुणाची
भीषण आगीत उडी,
मात्र सिलेंडरच्या स्फोटात गमावले प्राण


धारूर, दि. 29 (लोकाशा न्यूज) : गोठ्यास लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या लहान बहिण आणि भावास वाचविताना तरुणाचा सिलेंडरच्या स्फोटात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपरवाडा येथे शेत वस्तीवर घडली. रवी श्रीहरी तिडके ( 21 ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तालुक्यातील पिंपरवाडा गावापासून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके व रामकिसन कारभारी तिडके या दोघा भावांचे शेतात पत्र्याचे शेड आणि जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यास दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी एका घरात लहान बहिण व भाऊ अडकले. हे पाहून आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवीने धाव घेतली. गोठ्याजवळील टाकीतील पाणी घेऊन रवी आत शिरला. मात्र, अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात सिलेंडरचा पत्रा उडून रवीच्या मानेला लागला. यात गंभीर जखमी झाल्याने रवीच्या जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुण मुलाच्या मृत्यूची वार्ता गावात पसरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version