Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांच्या मागणीला यश ; सरकारने घेतली दखल,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्याला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

परळी  ।दिनांक २९।
राज्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन  भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणूकीस परवानगी द्यावी या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या मागणीला यश मिळाले आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी डाॅ. आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

   मागील दोन वर्षे कोरोनामुळे महापुरूषांची जयंती मोठया प्रमाणात साजरी करता आली नव्हती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने आता राज्य सरकारने महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या जयंती मिरवणुकीस  परवानगी द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना नुकतीच पत्राद्वारे केली होती. राज्यातील तमाम  आंबेडकरी जनतेच्या भावना सरकारने लक्षात घ्याव्यात असेही त्यांनी म्हटले होते.  

पंकजाताईंचे मानले आभार
————–
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज बैठकीत या विषयावर चर्चा झाली. भारतरत्न   डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा मोठया उत्साहात आणि उत्साहात साजरी करूया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या निर्णयाने तमाम आंबेडकरी जनतेत आनंद व्यक्त होत आहे. आमच्या जनभावना सरकारच्या लक्षात आणून देऊन मिरवणूकीस परवानगी मिळवून दिल्याबद्दल भाजपचे माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, रमेश गायकवाड, कपिल चोपडे,  तानाजी वाव्हळे यांनी  पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
•••• 

Exit mobile version