अंबाजोगाई (वार्ताहर)
मराठवाड्यातील सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकर्यांच्या जीवनात जीवनदायी ठरणार्या वॉटरग्रीडला ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्थगिती दिली होती.एवढेच नाही तर ही योजना योग्य नसल्याचे सांगत बासनात गुंडाळून ठेवली.मात्र शुक्रवारी विधीमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वॉटरग्रीड योजना स्थगित केला नसल्याचा खोटा दावा केला.माञ सरकारने जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात सदरील योजनेला साधी दमडीची ही आर्थिक तरतूद केली नाही किंवा प्रशासकीय पातळीवर कुठल्याही हालचाली नाहीत हे विशेष.केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी विधीमंडळात दिलेले उत्तर धादांत खोटे असल्याचा आरोप भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला त्यांनी लाल फितीत आडकवून ठेवले.या भागाचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी,लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आणि शेतकर्यांच्या जीवनात सिंचनाद्वारे आर्थिक क्रांती घडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी दूरगामी विचार करून व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ही योजना मराठवाड्याच्या भल्यासाठी मंजुर केली होती.२५ ते ३० हजार कोटींचा आराखडा त्यासाठी तयार करून दहा हजार कोटी रूपयांची तरतूद केली होती.मात्र ठाकरे सरकार सत्तेवर येताच त्यांनी या भागातील लोकांच्या घशातील पाण्याचा घोट ही काढून घेतल्याप्रमाणे योजनेला स्थगिती देवुन टाकली.वास्तविक पाहता महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली.कागदोपत्री सुद्धा योजनेची हालचाल झाली नाही.उलट संबंधित खात्यामार्फत तांत्रिक तपासणी केल्याचे कारण सांगून सदर योजना मराठवाड्यात झाल्यानंतर भांडणे लागतील अशा प्रकारचा अहवाल अधिकार्यांवर दबाव टाकून या सरकारने मागवून घेतल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला.दुर्दैव म्हणजे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी योजनेसंदर्भात नकारात्मक भुमिका घेतली.तर समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे,आरोग्य मंत्री राजेश टोपे व इतर मंञी आणि नेते मंडळी हे विभागातले असून देखील योजने संदर्भात मुग गिळून गप्प बसलेले आहेत.मराठवाडा विभागातील ११ मोठ्या प्रकल्पातील पाणी नळ योजनेद्वारे ज्याची लांबी ३३०० किमी लोकांना खेडी,शहरे,वस्त्या आदी ठिकाणी घेवून जाणारी योजना आहे.अनेक भागात शेतकर्यांना सिंचनासाठीसुद्धा यातुन पाणी उपलब्ध झाले असते.पण,महाविकास आघाडी सरकारची नियत सदरील योजना पुर्ण करण्याची नाही हे आता स्पष्ट दिसून येत आहे.वारंवार मागणी होवून सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी योजनेकडे शंभर टक्के दुर्लक्ष केले.जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात एक रूपयांची तरतूद केली नाही.काल विधीमंडळात बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी योजनेला स्थगिती दिली नसल्याचा खोटा दावा केला.स्थगिती ही नाही आणि योजना आहे तिथेच रखडून पडली आहे.तर मग विधीमंडळात केलेला दावा धादांत खोटा असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला.याच पत्रकाच्या माध्यमातून बोलताना ते म्हणाले की,वॉटरग्रीड योजनेचे गांभीर्यच ठाकरे सरकार मध्ये मराठवाड्यातून मंत्री असलेल्या पुढार्यांनाच नाही.एकही पुढारी वॉटरग्रीड योजनेसाठी आवाज उठवित नसून त्यांची दातखिळी बसल्यासारखे गप्प का बसतात ? हा सवाल त्यांनी केला आहे.मराठवाड्यातील लोकांच्या जीवनातील अठराविश्वे दारिद्रय घालविण्यासाठी सदर योजना ही अत्यंत महत्वाची असून महाविकास आघाडी सरकारने टोलवा-टोलवी न करता विशेष बाब म्हणून योजना कार्यान्वित करावी अशी मागणी भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.
======