Site icon लोकाशा-बंब न्यूज

डोंगरपिंपळा बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शासन व्हावे,पंकजाताई मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

परळी ।दिनांक २६।
डोंगर पिंपळा (ता. अंबाजोगाई) येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला गावातील तरुण किरण रामभाऊ शेरेकर (वय २३) याने १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात बोलावुन तिच्यावर बलात्कार केला. एका गरीब व अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर सदर मुलगी व तिचे आई वडील प्रचंड तणावाखाली व दहशतीखाली आहेत.या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केलेली असली तरी आरोपीला जास्तीत जास्त कठोर शासन होणे आवश्यक आहे. आपण या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, घटनेचा संपुर्ण गुप्तता पाळुन वेगाने तपास करावा आणि आरोपीस कडक शासन करावे, अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

कुटुंबियांनी घेतली भेट ; पंकजाताई अधिकाऱ्यांना बोलल्या

पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली. त्यांनी हे संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांना फोन केला व आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यास सांगितले. तथापि, अशा प्रकरणाची वाच्यता अथवा चर्चा करणे किंवा क्रेडिट घेणे हे आपल्या तत्वात बसत नसल्याने याविषयी आपण कुठेही बोलले नसल्याचे पंकजाताई म्हणाल्या.
••••

Exit mobile version