Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडच्या पोलीस प्रशासनाकडून तीन महिन्यांपासून पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी दिरंगाई ; अनेकांचे हाल – सलीम जहाँगीर,पोलीस अधीक्षकांना निवेदन ; खा.प्रितमताईंना भेटणार

बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची आणि हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून पासपोर्ट कार्यालय येथील पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यात आले आहे. मात्र पासपोर्टसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्याचे पोलीस प्रशासनाकडून व्हेरिफिकेशन होत नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेकांचे हाल होऊ लागले आहेत. पासपोर्ट व्हेरिफिकेशनच होत नसल्यामुळे पुढील सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. याचा फटका अनेक विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही बसू लागला आहे. यासंदर्भात भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. या प्रश्नी लवकरच खा. प्रीतम ताई मुंडे यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बीड येथील विद्यार्थी , नागरिकांकडून पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी तो अर्ज पोलीस प्रशासनाकडे पाठवला जातो. मात्र तीन महिन्यांपासून पोलीस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट व्हेरिफिकेशन विभागात त्याची फारशी दखल घेतली जात नाही. ऑनलाइन अर्जांचे व्हेरिफिकेशन होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसह नागरिकांची पासपोर्ट प्रक्रिया जिथल्या तिथे ठप्प होऊ लागली आहे. परिणामी विद्यार्थ्यांसह पासपोर्ट आवश्यक असलेल्या नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयातील व्हेरिफिकेशन विभागाला स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. मात्र बदली होऊन गेलेल्या अधिकाऱ्याने अद्याप पर्यंत त्यांची डिजिटल स्वाक्षरी जमा केलेली नाही. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊनही केवळ डिजिटल स्वाक्षरी आणि डोंगलमुळे व्हेरिफिकेशन प्रकिया ठप्प झालेली आहे. यासंदर्भात तातडीने डिजिटल स्वाक्षरीचा प्रश्न सोडवून प्रलंबित पासपोर्ट व्हेरिफिकेशन करावे अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांना फायदा व्हावा म्हणून पासपोर्ट कार्यालय जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले असताना पोलीस प्रशासनाकडून तब्बल 3 – 3 महिने पासपोर्ट व्हेरिफिकेशन होत नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे याप्रश्नी खा. प्रीतमताई मुंडे यांना भेटणार असल्याचे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version