Site icon लोकाशा-बंब न्यूज

आ.सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

मुंबई- मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर व भाजप आमदार सुरेश धस हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. बोगस दस्ताऐवजांच्या आधारे तब्बल 27 कोटींचे कर्जवाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत.
धस यांच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आले होते. मुंबै बँकेने या कर्जप्रकरणात मोठी अनियमितता केलेली असून सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद आणि आर्थिक गैरवापर करण्याच्या उद्देशाने केल्याचे दिसून येत आहे.   हितसंबंधित लोकांना कर्ज वाटप केलेले असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तावेजांच्या आधारे 27 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या वाटप केल्यामुळे कर्ज देणार व घेणार यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक व अनियमितताअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार खात्याने दिले आहेत. हे कर्ज वाटप करण्यात आले, त्यावेळी प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे अध्यक्ष होते.

Exit mobile version