बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : उद्या दि. आठ मार्चपासून आकरा मार्चपर्यंत बीड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी रब्बी पीकांची काळजी घ्यावी, पिकांचे नुकसान झाल्यास तात्काळ त्याची विमा कंपनीकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा आणि जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी बाबासाहेब जेजूकर यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येते की भारतीय हवामान विभागाद्वारे 8 मार्च 2022 ते 11 मार्च 2022 या दरम्यान महाराष्ट्रात तसेच बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये वेगाच्या वार्यासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे, तरी काढणी पश्चात सुकवणी केल्या जाणार्या पिकांचे काढणीनंतर सुरक्षित जागी योग्य व्यवस्थापन करावे. तसेच जे पीक काढणीला आलेले आहेत त्याचे हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार पिक काढणीचे नियोजन करण्यात यावे. दरम्यानच्या काळामध्ये पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत,पाणी साचून जर नुकसान झाले तर रब्बी 2021-22 पिक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी 72 तासात पिक विमा कंपनीकडे नुकसानीच्या ऑनलाइन तक्रार / पूर्वसूचना करावी, तालुका विमा प्रतिनिधी तसेच टोल फ्री क्रमांक यासोबत देण्यात आलेले आहेत. तरी दरम्यानच्या काळामध्ये नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकरी बांधवांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी बाबासाहेब जेजूकर यांनी केले आहे.