Site icon लोकाशा-बंब न्यूज

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबीरात ५ हजार रूग्णांची तपासणी,स्वतःची तब्येत बरी नसतांना पंकजाताई मुंडेंनी घेतली गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी!,११०० जणांचे कोविड लसीकरण ; राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या नोंदणीला सुरवात ; ७२८ लाभार्थ्यांची झाली नोंद

परळी ।दिनांक ०६।
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात आज पाच हजार रूग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. १८ ते २५ वयोगटातील ११०० मुलामुलींचे कोविड लसीकरण तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या जिल्हयातील नोंदणीचा शुभारंभ खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला, आज पहिल्याच दिवशी या योजनेसाठी ७२८ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आज मोफत सर्व रोगनिदान तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराला शहर व ग्रामीण भागातील रूग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सकाळी शिबीराचे उदघाटन दीप प्रज्वलन तसेच धन्वंतरी आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. सूर्यकांत मुंडे, डाॅ. बालासाहेब कराड, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. राजकुमार जाजू, डाॅ. दे. घ. मुंडे, डाॅ नितीन चाटे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ मोरे, डाॅ. मोराळे, परळी उप जिल्हा रूग्णालयाचे डाॅ. अरूण गुट्टे, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे, दीनदयाळ बॅकेचे उपाध्यक्ष ॲड राजेश्वर देशमुख, शिवाजीराव गुट्टे, महिला काॅलेजचे अध्यक्ष संजय देशमुख, जि.प. सदस्य प्रदीप मुंडे, नगरसेवक पवन मुंडे, उमाताई समशेट्टे, श्रीराम मुंडे, उषाताई मुंडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषाताई मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

पंकजाताईंनी घेतली गोरगरिबांची काळजी

पंकजाताई मुंडे यांची तब्येत बरी नसल्याने त्या शिबीरात उपस्थित राहू शकल्या नाहीत, त्यांनी मोबाईल वरून संबोधन केले. त्या म्हणाल्या, आरोग्य हा जीवनात सर्वात महत्वाचा घटक आहे. गरीब व मध्यमवर्गीयांना महागडे उपचार परवडत नाहीत. गेली अनेक वर्षांपासून आम्ही आरोग्य शिबीर घेत आहोत, लाखो रूग्ण तपासले, शेकडो शस्त्रक्रिया मोफत केल्या. माझं स्वतःचं आरोग्य ठिक नाही, पण तुमच्या आरोग्याची मला चिंता आहे म्हणून महिला दिनानिमित्त आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे, हे गिफ्ट आहे. याठिकाणी रूग्ण सुदृढ व्हावा यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

हजारो लोकांची काळजी घेणारी लेक तुम्हाला लाभली : खा.डॉ.प्रितमताई मुंडे

सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी,त्यांचे दुःख निवारण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी महिला दिनाच्या औचित्याने हा लोकोपयोगी उपक्रम गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविला आहे. या शिबिरातून अनेकांच्या दुःख,यातना कमी करण्याचा पंकजाताईंचा प्रयत्न आहे,हजारो लोकांची काळजी घेणारी लेक तुम्हाला लाभली आहे, तिच्या पाठीशी आशीर्वाद उभे करा अशी भावना खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा शुभारंभ

या शिबिरात राष्ट्रीय वयोश्री योजनेचा शुभारंभ खा.डॉ प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. साठ वर्षांवरील नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचे निवारण करणाऱ्या आणि निराधाराना आधार देणाऱ्या लोकोपयोगी योजनेचा बीड जिल्ह्यात शुभारंभ करताना मनस्वी आनंद होतो आहे, या योजेतून वयोवृद्धांना सन्मानजनक आयुष्य आणि आरोग्य मिळणार आहे, योजनेअंतर्गत गरजवंतांना सर्व प्रकारची यंत्र आणि साधने उपलब्ध करून देण्यात येणार असून वयोवृद्धांची हेळसांड थांबणार असल्याचे खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. शालिनी कराड यांनी केले तर संचलन ज्ञानोबा सुरवसे यांनी केले.

क्षणचित्रं

• शिबीरात शहर व ग्रामीण भागातील रूग्णांनी तपासणीसाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.

• परळीसह बीड, अंबाजोगाई, केज, धारूर, येथील विविध आजारांवरील तज्ज्ञ डाॅक्टर्स तसेच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयाच्या टीमने यात सहभाग घेतला होता. सर्व डाॅक्टर्सचे खा. प्रितमताई यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

• खासदार डॉ.प्रितमताई स्वतः डाॅक्टर असल्याने त्यांनी देखील रूग्णांची तपासणी व उपचार केले.

• रक्त तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, लसीकरण, औषधी वाटप तसेच रूग्णांच्या विविध आजारांचे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले होते. रूग्णांना पिण्याचे पाणी, चहा, नगरसेविका उमाताई समशेट्टे यांच्या तर्फे ज्यूस यावेळी देण्यात आला.

• गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी मोठी मेहनत घेतली.
••••

Exit mobile version