Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळी – बीड महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव द्या,आढावा बैठकीत खा.प्रितमताई मुंडे यांच्या सूचना ; बीड शहरातून जाणाऱ्या महामार्गाचीही केली स्पॉटपाहणी

बीड । दि . ०२ ।
बीड जिल्ह्यातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेला परळी – बीड मार्ग चौपदरी करण्याचा निर्धार खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्गाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.परळी – बीड हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण होणे आवश्यक आहे, राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासनाने यासाठी प्रस्ताव द्यावा,चौपदरीकरणाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे अशा सूचना यावेळी खा.प्रितमताई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजना आणि प्रकल्पांचा खा.प्रितमताई मुंडे यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीला न्याय देणारे काम करावे,राजकीय हेतू किंवा द्वेष बाळगून दबावापोटी काम करू नये अशी तंबी यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिली.तद्नंतर राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे विभागाची बैठक घेऊन रस्ते आणि रेल्वे कामांचा ही त्यांनी आढावा घेतला.तसेच दिशा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पंधरा ते अठरा वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासंदर्भात सूचना करताना महाविद्यालये आणि विद्यालय परिसरात लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

दरम्यान दिशा समितीची बैठक घेत असताना परळी पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारावर खा.प्रितमताई मुंडे यांनी ताशेरे ओढत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.तालुक्यात पंचायत समिती मार्फत सुरू असलेल्या कामांसंदर्भात सामान्य जनतेतून होत असलेल्या तक्रारींची आपण गांभीर्याने दखल घेणार आहोत असा इशारा खा.प्रितमताई मुंडे यांनी प्रशासनाला दिला. यानंतर झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बैठकीत बीड शहरातून जाणाऱ्या महामार्ग कामाचा आढावा घेऊन यांनी अधिकाऱ्यांसोबत महामार्गाची स्पॉटपाहणी केली.

•••••

Exit mobile version