केज, दि. 1 (लोकाशा न्यूज) : केज तालुक्यातील लव्हरी येथील चाळक यांचे वडवणी येथील एका हॉटेलमधून अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करून त्यांच्या मुलांना त्यांची सुटका करण्यासाठी 12 लाख रुपयांची मागणी केली जात आहे. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर जर पैसे आणून दिले नाहीत तर कापून टाकू अशी फोन वरून धमकी दिली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सुधाकर उर्फ सुदाम चाळक हे महालक्ष्मी साखर कारखाना येथे मजूर पुरवठा अधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांचे दि. 16 फेब्रुवारी रोजी वडवणी येथून काही अज्ञात लोकांनी अपहरण केले आहे. त्यामुळे दि. 25 रोजी त्यांच्या नातेवाईकांनी चाळक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दि.27 रोजी त्यांचा भाऊ व मुले यांना चाळक यांच्या फोन वरून अज्ञात लोकांनी फोन केला. अपहरणकर्ते हे सुधाकर उर्फ सुदाम चाळक यांच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची मागणी करीत आहेत. तसेच त्यांना अमानुष मारहाण करीत असल्याचा कॉल रेकरडींगचा आवाज ऐकू येत असून सुधाकर चाळक हे मारहाणीमुळे विव्हळत असल्याचे त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. अपहरणकर्त्याला त्यांचा मुलगा हा मारहाण न करण्याची विंनती करीत आहे. तरी देखील ते अमानुष व बेदम मारहाण करीत असल्याचा आहेत. अपहरणकर्ते हे हिंदी भाषेत बोलत आहेत व शिवीगाळ करीत आहेत. सुटकेसाठी ते कर्नाटक येथील शंकेश्वर साखर कारखान्यावर पैसे घेऊन येण्याची मागणी करीत आहेत. जर पैसे आणून दिले नाहीत तर कापून टाकू व जीवे मारू अशी धमकी फोनवरून दिली आहेत. दि. 28 फेब्रुवारी रोजी अक्षय चाळक याने त्याचे वडील सुधाकर चाळक यांचे अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहरण करू मारहाण करून पैशासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 61/2022 भा.दं.वि. 364(अ), 365, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सय्यद हे तपास करीत आहेत.
पैशाच्या देवाण घेवाणीतुन
अपहरण झाल्याचा संशय
सुधाकर चाळक यांचे कुटुंबीय हे जरी त्यांच्याकडे कुणाचे पैसे नव्हते असे सांगत असले तरी मात्र अपहरणकर्ते आणि त्यांच्या मुलातील संवादावरून हे अपहरण पैशाच्या व्यवहारातून झाले असल्याचे जाणवते.