Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुलांच्या लसीकरणाला हवी तशी गती मिळेना ! जिल्ह्यातील 411 मुख्याध्यापक, 11 गटशिक्षणाधिकारी अन् 9 तालुका आरोग्य अधिकार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार, कलेक्टरांनी अ‍ॅक्शन घेतली, सर्वांना काढल्या कारणे दाखवा नोटीसा, दोन दिवसात खुलासे सादर करावे लागणार, कामात सुधारणा करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यन्त आणखी एक संधी


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला जिल्ह्यात हवी तशी गती मिळत नसल्याचे समोर येत आहे. यामुळेच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आता कडक अ‍ॅक्शन घेतली आहे. त्यांच्या आदेशानेच जिल्ह्यातील 411 मुख्याध्यापक, प्राचार्य, 11 गटशिक्षणाधिकार्‍यांबरोबरच नऊ तालुका आरोग्य अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा काढण्यात आल्या आहेत. लसीकरणातील असमाधानकारक कामगिरीमुळे तुमच्यावर का कारवाई प्रस्तावित करू नये, असे या नोटीसांमध्ये म्हटले आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात सर्वांना आपले खुलासे सादर करावे लागणार आहेत. खुलासे समाधानकारक आले नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे, त्याचबरोबर कामात सुधारणा करून लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत आणखी एक संधी दिली आहे.
केंद्र सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांचेही लसीकरण करण्यास मंजूरी दिलेली आहे, त्यानुसार बीड जिल्ह्यात लसीचे डोसही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. परिणामी शाळा, महाविद्यालयामध्ये कोरोनाची लागण होवू नये, यासाठी लसीकरण महत्वाचे आहे, त्यामुळेच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, सीईओ अजित पवार यांनी या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या मुद्द्याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. असे असतानाही जिल्ह्यातील अनेक जण याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. यामुळेच या गटातील लसीकरणाला जिल्ह्यात हवी तशी गती मिळत नसल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस घेणार्‍या मुलांची टक्केवारी 70 तर दुसरा डोस घेणार्‍या मुलांची टक्केवारी 35 एवढी आहे. याच टक्केवारीवरून जिल्हाधिकारी संबंधित यंत्रणेवर नाराज असून कामात कुचराईपणा करणार्‍यांवर ते आता थेट कारवाई करणार आहेत. त्याअनुषंगानेच त्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील नऊ तालुका आरोग्य अधिकारी (बीड आणि अंबाजोगाई वगळून), सर्व गटशिक्षणाधिकारी आणि 411 मुख्याध्याप/प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीसा काढण्यात आल्या आहेत. तुमच्यावर का कारवाई प्रस्तावित करू नये, यासंदर्भात दोन दिवसात खुलासा मागविण्यात आलेला आहे. त्यामुळे खुलासे असमाधानकारक देणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर या गटातील लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत आणखी एक संधी दिली आहे. त्यामुळे या गटातील मुलांच्या लसीकरणाला गती मिळणार की लसीकरणाचे भिजत घोंगडे तसेच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version