बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : मार्च एण्डला आता फक्त 37 दिवस उरले आहेत. त्यामुळे सन 2020-21 मधील निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च झाला पाहिजे, हा निधी खर्च झाला नाही तर संबंधित खातेप्रमुख, गटविकास अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई केली जाईल, अशा स्पष्ट सुचना जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार आणि एसीईओ वासूदेव सोळंके यांनी दिल्या आहेत. त्यामुळेच झेडपीचे सर्व खातेप्रमुख आणि सर्व गटविकास अधिकारी आता गतीने कामाला लागले आहेत.
मंगळवारी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके यांनी मार्च एण्डच्या धरतीवर जिल्ह्यातील सर्व खाते प्रमुख आणि बीडीओंची बैठक घेतली, साधारणत: सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली बैठक दुपारी साडे चारच्या सुमारास संपली, या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, विशेष म्हणजे सन 2020-21 मधील निधीसंदर्भात आढावा घेवून तो तातडीने खर्च करण्याच्या सुचना यावेळी पवार आणि सोळंकेंनी संबंधित अधिकार्यांना दिल्या, मार्च एण्डला आता फक्त 37 दिवस उरले आहेत. त्यामुळे या वर्षातील एकही रूपया लॅप्स होता कामा नये, निधी लॅप्स झाला तर संबंधित खातेप्रमुख आणि गटविकास अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई केली जाईल, असा ईशाराही यावेळी पवार आणि सोळंकेंनी दिला आहे. त्यामुळेच आता सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकार्यांना 37 दिवसात सन 20-21 मधील निधी कोणत्याही परिस्थितीत खर्चच करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, स्वच्छता व पाणी पुरवठा, ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे, महिला बालकल्याणचे चंद्रशेखर केकान, कॅफो श्री.जट्टाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गित्ते, शिक्षणाधिकारी अजय बहीर, विक्रम सारूख, कार्यकारी अभियंता पोपट पवार, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.उबाळे, कृषी अधिकारी साळवे, पशुसंवर्धन अधिकारी श्री.देशमुख यांच्यासह इतर अधिकार्यांची उपस्थिती होती.