Site icon लोकाशा-बंब न्यूज

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेतून जिल्ह्यातील 1367 गावांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी,जनहितार्थ योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज- राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी,
केंद्र सरकार द्वारा देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहच करण्यासाठी जलजीवन मिशन महत्वकांक्षी योजना 15 ऑगस्ट 2019 पासून सुरु केली आहे.जिल्ह्याच्या कर्तव्य दक्ष खासदार डॉ. प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्याचा समावेश झाला. साधारण 1367 गावांचा समावेश जलजीवन मिशन योजनेत झाला आहे. या मिशनमधील पाणीपुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. जलजीवन मिशन ग्रामीण जनतेसाठी खऱ्या अर्थाने जलसंजीवनी ठरणार आहे. तेव्हा या पाणीपुरवठा योजना राबवताना राजकीय दृष्टीकोन न ठेवता ग्रामीण जनतेच्या हितासाठी भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने प्रभावीपणे राबवाव्यात. जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने सचोटीने प्रयत्न करावेत. असे आवाहन भाजप जिल्हाअध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील जनतेसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना देशभरात सुरु केली. अनेक दुर्गम भागात या योजनेचा लाभ जनतेला मिळणार आहे. पिण्याचे पाणी हि गंभीर समस्या ग्रामीण भागात भेडसावत असते. हजारो खेड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मैलो दूर महिलांना हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते.पाणी हि लोकांची मुलभूत गरज लक्षात घेऊन थेट प्रत्येक घरात पाणीपुरवठा करणे हि संकल्पना घेऊन भारता सरकारने हि योजना सुरु केलेली आहे. या योजनेसाठी दहा टक्के लोकवर्गणी व नव्वद टक्के रक्कम केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. योजना गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारने 3.60 लाख करोड रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. जिल्ह्यातील 86 गावांच्या पाणीपुरवठा योजनेंची ई निविदा सुरु असून पुढील टप्पा 105 गावांचा आहे. टप्याटप्याने उर्वरित गावांचे टेंडर प्रसिद्ध होईल.

यापूर्वी ग्रामीण भागात अनेकदा पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या परंतु खऱ्या अर्थाने त्या अपयशी ठरल्या करोडो रुपयाचा निधी खर्च झाला. परंतु ग्रामीण जनतेची पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झालीच नाही. त्यामुळे जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी राज्यकर्ते, प्रशासन आणि ग्रामस्थ यांनी डोळ्यात तेल टाकून या योजनेचे काम निकृष्ट होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. असे आवाहन हि राजेंद्र मस्के यांनी केले.

Exit mobile version