Site icon लोकाशा-बंब न्यूज

गावे आदर्श करण्यासाठी सीईओंनी सरपंचांची बांधली मोट ! ..तर राज्यासाठी आदर्श सरपंच असणार्‍या भास्कर पेरे पाटलांनी नव्या उमेदीने काम करण्यास दिले बळ, ‘स्मार्ट ग्राम’ने पुन्हा एखदा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष घेतले वेधून, सरपंच, ग्रामसेवक अन् ग्रामस्थांची एकी अन् नेकी महाराष्ट्रात इतिहास रचणार


धारूर, दि. 17 (लोकाशा न्यूज) : गावे आदर्श करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील सरपंचांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. मागच्या दोन दिवसांपुर्वीच त्यांनी तालुक्यातील आवरगाव याठिकाणी तालुक्यातील सरपंचांची परिषद घेतली, या परिषदेला तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला, विशेष म्हणजे याच परिषदेसाठी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील हेही उपस्थित होते, पेरे पाटलांनी 25 वर्षात आलेले वेगवेगळे अनुभव सांगत यावेळी उपस्थित सरपंचांना नव्या उमेदीने काम करण्यास त्यांनी बळ दिले. वास्तविकत: आवरगावने जिल्ह्याच्या विकासाच्या नकाशावर नाव कोरून सर्वांचे लक्ष वेधून तर घेतलेलेच आहे, गावचे सरपंच, ग्रामसेवक अन् ग्रामस्थांच्या एकी अन् नेकीमुळे हेच गाव येणार्‍या काळात संपूर्ण महाराष्ट्रात इतिहास रचल्याचेही पहायला मिळणार आहे.
धारूरपासून चार किलो मिटर या अंतरावर आवरगाव वसलेले आहे. या गावात जन्म झालेल्या रामरावजी आवरगावकर यांनी गावाचे नाव जिल्ह्याबरोबरच दिल्लीच्या नकाशावरही कोरले, त्यांच्यानंतर आता युवा नेते अमोल जगताप यांनी या गावात विकासाची कास बांधण्यास सुरूवात केली आहे. त्यांना ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे आणि संपूर्ण ग्रामस्थांची पावलोपावली साथ मिळत आहे. त्यामुळेच गावातील एक एक विकास काम गतीने मार्गी लागत आहे. मागच्या एक वर्षांपुर्वीच या गावाने ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला होता, तर मागच्या दोनच दिवसांपुर्वी पुन्हा या गावाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत घेतलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविला आहे. त्यामुळेच हे गाव एक विकासाचे मॉडेल म्हणून महाराष्ट्रासमोर ठेवण्याचा चंग सीईओ अजित पवार यांनी बांधला आहे. याअनुषंगानेच त्यांनी मागच्या दोन दिवसांपुर्वी याच गावात धारूर तालुक्यातील सरपंचांची परिषद घेतली, या परिषदेला आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटीलही उपस्थित होते, गावात काम करताना कशा प्रकारे अडचणी येतात आणि त्या येणार्‍या अडचणींवर कशा प्रकारे मात करायची, या सर्व बाबी सांगून पेरे पाटलांनी नव्या उमेदीने काम करण्यास सरपंचांना बळ दिले. विशेष म्हणजे अगदी आमच्या पाटोद्यासारखेच आवरगावही महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्‍वासही यावेळी त्यांनी बोलून दाखविला, तसेच गावच्या विकासासाठी काय काय करायचे, त्यासाठी प्रशासन आपल्याला लागेल ती मदत करेल, असे सांगून यावेळी सीईओ अजित पवार, समान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.उबाळे यांनी आदर्श गावे बनविण्यासाठी सरपंचांना धडे दिले, आवरगावला पुढे घेवून जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी उत्कृष्ट कर्तव्य निभावले अशा कर्तृत्वान महिला आणि पुरूषांचा यावेळी याच कार्यक्रमात सीईओ अजित पवार आणि आदर्श सरंपच भास्कर पेरे पाटलांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे, दिलेल्या साथीचे यावेळी आपल्या प्रस्ताविकातून अमोल जगताप यांनी कौतूक केले, यावेळी व्यासपीठावर बीडीओ रविंद्र तुरूकमारे, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक संतोष शिनगारे, विस्तार अधिकारी श्री. आगळे, श्री. गिरी, श्री. बाबळे, कक्ष अधिकारी सुनिल शिंदे, आवरगावच्या सरपंच पद्मीनबाई जगताप, धारूर बाजार समितीचे संचालक अमोल जगताप, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक अशोक नखाते यांनी तर आभार ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांनी मानले.

सरपंच अन् ग्रामसेवकांच्या मेहनतीचे फळ
आवरगावने मागच्या एक-दिड वर्षात दोन वेळा जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे, त्यामुळेच या गावाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सरपंच पद्मनीबाई जगताप, युवा नेते अमोल जगताप आणि ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांनी क्षणोक्षणी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. गावात होत असलेल्या कामामुळेच स्वत: सीईओ अजित पवार एका मोठ्या भावाप्रमाणे ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. परवा तर सलग आठ तास गावात थांबून त्यांनी ग्रामस्थांना बळ दिले.

Exit mobile version