Site icon लोकाशा-बंब न्यूज

दोनशे विद्युत पंपाव्दारे अवैध पाणी उपसा सुरूच, आवरगावच्या साठवण तलावातील पाणी पातळी घटली, पाणी टंचाईचे संकट निर्माण होणार, प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष


धारूर, दि. 12 (लोकाशा न्यूज) : आवरगाव साठवण तलावाची पाणी पातळी घटली, रब्बी हंगाम संपला तरी उन्हाळी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा भर असून बेसुमार पाणी उपसा सुरू आहे. जवळ जवळ 200 विद्युत पंपाव्दारे हा अवैधपणे पाणी उपसा सुरू आहे, याकडे धारूर प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
धारूरपासून चार किलो मिटर अंतरावर आवरगाव हे गाव वसलेले आहे. या गावाच्या शिवारात एक साठवण तलाव आहे, रब्बी हंगामात याच तलावावरून शेकडो विद्युत पंपाव्दारे पाणी उपसा करण्यात आलेला आहे. आता रब्बी हंगाम संपला असला तरी अनेक जण उन्हाळी पिके घेत आहेत. यासाठी तब्बल दोनशे विद्युत पंपाव्दारे याच तलावातून अवैधपणे पाणी उपसा सुरू आहे. यामुळे भर उन्हाळ्यात आवरगावकरांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, अशा अवैध पाणी उपश्यामुळे यापुर्वी ग्रामस्थांना वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागलेले आहे, अशी गंभीर परिस्थिती असतानाही धारूर तहसिल प्रशासनाला याचे काहीच देणे घेणे नाही, दरम्यान धारूर तहसिल प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देवून अवैधपणे सुरू असलेला हा पाणी उपसा तात्काळ थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Exit mobile version