Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई आणि खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांची फलश्रुती,नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात दोनशे कोटींची तरतूद

बीड । दि. ०४ ।
बीड जिल्ह्याचा ड्रीम प्रोजेक्ट नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांची ही फलश्रुती म्हणावी लागेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. देशातील विविध रेल्वे प्रकल्प आणि विकास कामांना गती देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याला सुद्धा यामध्ये झुकते माप देण्यात आले आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे स्वप्न असलेला हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने रेल्वेच्या कामाला गती मिळणार आहे.

हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे सतत प्रयत्न करत आहेत. रेल्वेमार्गाच्या कामातील अडथळे असोत किंवा निधीची समस्या, संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रत्येक अडचण सोडवण्याचा त्यांचा यत्न आहे. नगर ते आष्टी दरम्यान पूर्ण झालेला एकसष्ठ किमीचा लोहमार्ग हा त्यांच्याच प्रयत्नांचा परिपाक असल्यामुळे लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील नागरीकांमधून व्यक्त होते आहे.

राज्य सरकारने समप्रमाणात निधी द्यावा

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सत्तेच्या काळात रेल्वेसाठी वेळोवेळी राज्य सरकारचा निधी उपलब्ध करून दिला होता.केंद्र आणि राज्याच्या समान निधीतून होत असलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी मागील तीन वर्षांत राज्य सरकारने तुटपुंजी मदत केली आहे. बीडकरांसाठी जिव्हाळ्याचा असलेला हा रेल्वेप्रकल्प वेळेत पूर्ण करायचा असेल तर राज्याने वेळोवेळी भरीव निधी देणे आवश्यक आहे.केंद्र सरकारच्या समप्रमाणात राज्याचा निधी मिळत नसल्यामुळे रेल्वेच्या कामाला खीळ बसू शकते.

••••

Exit mobile version