Site icon लोकाशा-बंब न्यूज

तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्यच ; जनता, कार्यकर्त्यांच्या पाठिशी आधीही होते, पुढेही राहील – पंकजाताई, महिलांनी पुढे आल्याशिवाय परळीत बदल घडणार नाही

परळी । दि. २८ ।
तुमचे माझ्यावर कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड म्हणजे तुमची सेवा करणं आहे अशी भावना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे व्यक्त केली. महिलांनी पदर खोचल्याशिवाय परळीत बदल घडणार नाही असे सांगतानाच जनता व कार्यकर्त्यांच्या पाठिशी मी आधीही होते, आताही आहे आणि पुढेही राहील असे सांगितले.

शहरातील प्रभाग क्रमांक चार गणेशपार भागात आयुष्यमान भारत योजना कार्ड, घरकुल प्रमाणपत्र वाटप आणि कमल सखी मंच नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थिताना संबोधित करताना त्या बोलत होत्या.राजकारणाची दिशा जो बदलतो तोच नेता असतो. लोकनेते मुंडे साहेबांसारखे नेतृत्व आपण दिले, त्यांनी राजकारणात कधी कुणाला त्रास दिला नाही. राजकारण हे मतदानापुरते असावे. आम्ही जनता आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत,त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त केला. बूथ स्तरावरील माझा कार्यकर्ता मतदारांशी सुसंवाद साधणारा,बोलका आणि निर्भीड आहे त्यामुळे त्याच्या पाठिशी मी खंबीरपणे उभी आहे असं त्या म्हणाल्या.

आम्ही बोलतो ते करून दाखवतो

पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो,परळी शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी चाळीस कोटींचा निधी दिला.तीर्थक्षेत्र आराखडा तयार केला,तो पूर्ण अंमलात आणला जावा. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत कोविड सेंटर सुरू केले, गरजूंना घरपोच जेवणाचे डबे दिले. कार्यकर्त्यांनी घरोघरी सेवा दिली हे आपले कर्तव्यच होते. एवढेच नाही तर प्रत्येकांनी योगदान देखील दिले. अशीच सेवा करत सातत्याने करीत राहील असे सांगत तुमच्या पाठिशी आधीही होते, आताही आहे व पुढेही राहील असा शब्द त्यांनी रहिवाशांना दिला. परळीला परत गतवैभव मिळवून द्यायचे आहे. महिलांनी पदर खोचल्याशिवाय परळीत बदल होणार नाही.माझा नगरसेवक तुमच्या दारात येऊन काम करेल,मतं विकत घेण्याची त्यांच्यात क्षमता नाही,तो पैसा जन्मभर पुरणार नाही, हे लक्षात घ्या. तुमचे माझ्यावर कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड म्हणजे तुमची सेवा करणे आहे अशी भावना पंकजाताई मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी गणेशपार भागातील लाभार्थी महिला व पुरूषांना कार्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमास वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष विनोद सामत, ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, संचालक प्रकाश जोशी, दत्ता देशमुख, डाॅ. शालिनी कराड, महादेव इटके, केशव माळी आदी उपस्थित होते. आयोजक राजेश कौलवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
•••••

Exit mobile version