घरासमोर लावलेली बुलेट सासूने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने चोरून नेल्याची फिर्याद जावयाने कर्जत पोलीस ठाण्यात दिली आहे. बाभुळगांव खालसा (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथील राहत्या घरासमोरून 1,20,000/-रुपयांची राँयल इंन्फिल्ड कंपनीची बुलेट चोरी गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या बुलेटला दोन चाव्या होत्या. दुसरी चावी सासुकडे होती. त्यामुळे सासूने ही बुलेट चोरून नेल्याचा संशय जावयाने फिर्यादीत वर्तवला आहे.
यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीत प्रविण लाला भोसले (वय 25 वर्षे धंदा शेती, रा बाभुळगांव खालसा ता कर्जत जि अहमदनगर) यांनी म्हटले आहे की, माझ्या घरात मी, पत्नी नाथा प्रविण भोसले, मुलगा उदयनराज, आई फुलाबाई लाला भोसले असे एकत्र राहतो. मी माझे दाजी बाबासाहेब नागद चव्हाण (रा. आनंदनगर, पाथर्डी ता पाथर्डी जि अहमदनगर) यांच्या नावावर माझ्या वापरासाठी राँयल इंन्फिल्ड कंपनीची बुलेट (एम एच 16 सी एस 8159) जुलै 2020 मध्ये घेतली.
या बुलेटचा वापर मी करतो. माझ्या बुलेट गाडीला दोन चाव्या असून एक माझ्याकडे व दुसरी माझी सासु कविता अविनाश काळे (रा. वाकी ता आष्टी जि बीड) यांच्याजवऴ आहे. दि. 14/01/2022 रोजी रात्री 10/00 वा चे सुमारास मी व आमचे घरातील लोक जेवण करुन आमचे घरात झोपी गेलो. त्यावेऴी मी माझी बुलेट गाडी आमच्या घराचे समोर लावलेली होती. त्यानंतर दि 15/01/2022 रोजी पहाटे 03/00 वाजेच्या सुमारास मी लघूशंकेसाठी उठुन आमच्या घराबाहेर आलो त्यावेऴी माझी बुलेट गाडी दारात लावलेली होती.त्यानंतर मी झोपी गेलो. त्यानंतर पहाटे 05/15 वाजेच्या सुमारास मी झोपेतून उठलो. त्यावेळी मला आमच्या घरासमोर लावलेली बुलेट गाडी दिसली नाही. त्यामुळे मी माझी पत्नी व घरातील लोकांना गाडी दारात नसल्याचे सांगितले. त्यावेळी आंम्ही सर्वांनी आमची बुलेट गाडी घराच्या आसपास तसेच परिसरात पाहीली असता ती मिऴून आली नाही. बुलेट गाडीचा शोध घेत असताना मला समजले की, माझी सासु कविता अविनाश काळे (रा वाकी ता आष्टी जि बीड) यांच्याजवळ माझ्या गाडीची दुसरी चावी असल्याने त्यांनीच त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने माझी गाडी माझी सासु कविता अविनाश काळे यांनी चोरून नेल्याचा संशय आहे. बुलेट गाडी व त्यातील डिक्कीमध्ये ठेवलेले गाडीचे आर सी बुक माझी सासु कविता अविनाश काळे (रा वाकी ता आष्टी जि बीड) यांनी त्यांच्या ओळखीच्या अज्ञात नातेवाईकाला सांगून चोरून नेल्याचा संशय आहे. तसेच आज पावेतो मी माझ्या बुलेट गाडीचा बाभुळगांव खालसा, आष्टी, माहीजऴगांव, कर्जत, राशिन, कडा आदी गाव परिसरात शोध घेतला. मात्र बुलेट मिऴून आली नसल्याचे प्रविण लाला भोसले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.