Site icon लोकाशा-बंब न्यूज

माजी नगराध्यक्षांना जाता जाता सुचले शहाणपण – ॲड. शेख शफिक


बीड, (प्रतिनिधी) – नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पाय उतार होता होता बीड नगर परिषदेवर उर्दूतून नाम फलक लावला तसेच संपूर्ण शहरात सहा दिवसाआड नळांना पाणी पुरवठा करण्याची पत्रकबाजी केली. यामुळे शहरातील जनतेने हुरळून जाण्याचे कारण नाही. त्यांनी आगामी येऊ घातलेल्या बीड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांसमोर जाऊन मतांचा जोगवा मागण्यासाठी केलेली ही खेळी आहे. असा हल्लाबोल एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे जवळपास गेल्या तीस-पस्तीस वर्षापासून अपवादात्मक कालावधी वगळता बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. या काळात त्यांनी बीडची जनता आणि बीड शहरासाठी नेमके किती चांगले व किती खराब काम केले ? हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. सध्या बीड नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहे. यामुळे त्यांना नगराध्यक्षपदाची खुर्ची सोडावी लागली. परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे यावेळीही निवडून आल्यापासून ते कार्यकाळ संपेपर्यंत फक्त खुर्ची उबविण्याचे काम केले. मुदत संपण्यापुर्वी मात्र नेहमी सारख्या त्यांच्या स्टाईल ने शहराच्या विविध भागात रस्ते व नाल्यांच्या कामांचे उद्घाटन करण्याचा सपाटा हाती घेतला होता. याबाबत त्यांचा इतिहास साक्ष आहे की, ते जर डझनभर उद्घाटन करत असतील तर त्यातून दोन कामे सुद्धा पूर्णत्वास जात नाही. उद्घाटन करून फक्त जनतेच्या डोक्यात आणि नजरेत धूळफेक करण्याचे कार्य नेहमीप्रमाणे यंदाही त्यांनी केलेले आहे. वृत्तपत्रातून पत्रकबाजी करण्याच्या नादात यावेळी त्यांनी हेही म्हटले की, त्यांनी विकास करताना जातीनिहाय भेदभाव कधीही केला नाही. जे की धादांत खोटे आहे. त्यांनी जातीनिहाय भेदभाव तर केलाच शिवाय उच्चभ्रू , मध्यमवर्गीय आणि गोरगरीब असा भेदभाव ही केला. म्हणूनच आज बीड शहरामध्ये प्रतिष्ठितांच्या व दलित-मुस्लिम वगळता इतर वसाहती मध्ये टकाटक रस्ते व नाल्या दिसून येतात. तिथे गेल्या अनेक वर्षांपासून पाच सहा दिवसाआड नळांना पाणी सोडले जाते. ही बाब चांगली आहे यात दुमत नाही. तेही आमचे शहरी बांधवच आहेत. मात्र मध्यमवर्गीय हातावर पोट असणाऱ्या तसेच दलित-मुस्लिम वसाहतींमध्ये रस्ते आणि नाल्यांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी केलेला भेदभाव स्पष्टपणे नजरेत येतो. जिथे चालायला रस्ते धड नाही, जागोजागी खड्डेच खड्डे, नाल्या बांधलेल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. तसेच नळांना १५ किंवा २० दिवसाआड नळांना पाणी दिले जाते. हा भेदभाव नाही तर काय आहे ? शिवाय ज्या बीड नगर परिषदेवर यांच्या नगराध्यक्ष पदावर येण्याअगोदर मराठीसह इंग्रजी आणि उर्दू भाषेतून ही बीड नगर परिषदेचे नाव लिहिलेले होते. त्या नगरपरिषदेवर हे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर इंग्रजी आणि उर्दू नाम फलकाला त्यांनी तिलांजली दिली आणि फक्त मराठीतून नाव लावले आणि आता या वेळेस त्यांचा कालावधी संपतांना जाता-जाता उर्दूतून नाम फलक लावण्याचे शहाणपण दाखविले. त्यांच्या या सर्व खेळी या बीड नगर परिषदेसाठी येऊ घातलेल्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाऊन मतांचा जोगवा मागण्यासाठी केलेले प्रदर्शन असल्याचा हल्लाबोल एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी दिलेल्या पत्रकातून केला आहे.


आयएमआयएम ने उर्दूतून नाम फलक लावण्याची केली होती मागणी !
बीड नगर परिषदेवर उर्दूतून नामफलक लावण्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण करण्यात येत असल्याने ८ नोव्हेंबर २०२१ रोजी एआयएमआयएम पक्षाने उर्दूतून नाम फलक लावण्याची मागणी केली होती.

Exit mobile version