गेवराई, दि.१४ (प्रतिनिधी) ः- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून गेवराई शहरातील भिमनगर परिसरात भव्य बौध्द विहार बांधकामास मान्यता मिळाली आहे. दोन कोटी रुपये किंमतीच्या बौध्द विहाराची दुमजली इमारत गेवराई शहराच्या वैभवात भर टाकणारी ठरेल असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. या कामास नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच बौध्द विहार बांधकामाची पुढील कार्यवाही होणार आहे. गेवराई नगर परिषदेने याकामी निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे कामास विलंब झाल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची भावना आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून गेवराई शहरात भव्य दुमजली बौध्द विहार बांधकामाची संकल्पना माजी आ.अमरसिंह पंडित यांनी मांडली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. जिल्हाधिकार्यांनी यापूर्वीच या कामाला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. गेवराई नगर परिषदेकडे या कामासाठी सातत्याने नाहरकत प्रमाणपत्राची मागणी प्रशासकीय यंत्रणेने केल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आर.पी.आय. चे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर व त्यांच्या सहकार्यांनी याकामी नगर परिषदेत जावून मुख्याधिकार्यांना जाब विचारला, बौध्द विहाराच्या बांधकामास नाहरकत प्रमाणपत्र देता येणार नाही असे लेखी पत्र मुख्याधिकार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्यामुळे या कामासाठी मोठा विलंब झाला. आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी याकामी नगर पालिका प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. नगर परिषदेच्या अडथळ्यामुळे याकामी झालेल्या विलंबामुळे गेवराई शहरातील आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची भावना आहे.
माजी आ.अमरसिंह पंडित यांनी याकामी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अधिक्षक अभियंता यांचेकडून या कामास तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. नगर परिषदेच्या बोगस गुत्तेदारी धोरणाला तडा देवून अद्यावत दुमजली बौध्द विहार बांधकामास मान्यता मिळवून दिल्याबद्दल आर.पी.आय. चे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, धम्मपाल भोले, अॅड.बाबासाहेब घोक्षे, भरत सौंदरमल, प्रकाश साळवे, बबलू सौंदरमल, गौतम कांडेकर, विजय साळवे, सुमेध भोले, बाळू माटे, बंडू भोले, सोनम कांडेकर, दिपक निकाळजे, शिवाजी भोले, राहुल कांडेकर, सचिन कांडेकर, रविंद्र कांडेकर यांच्यासह आदींनी अमरसिंह पंडित यांचे अभिनंदन केले.