Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्यात निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळेच शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ – सलीम जहाँगीर,पंकजाताईंच्या काळात हजारो कोटींचा विमा मिळाला होता

बीड ( प्रतिनिधी ) पावसामुळे पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालक म्हणून पालकमंत्री आणि शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवे. मात्र आज हक्काचा पीक विमा मिळावा म्हणून शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येत आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळेच आज शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याचे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे. पंकजाताई मुंडे पालकमंत्री असतांना पाच वर्षांत त्यांनी हजारो कोटी रुपयांचा विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळवून दिला होता असेही सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात सन 2020 आणि 2021 चा पीक विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांनी आतापर्यंत अनेकवेळा प्रशासनाला निवेदने दिली, आंदोलने केली तरही अद्याप पर्यंत त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गावागावात रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलने केली. पंकजाताई जिल्ह्याच्या पालकमंत्री असतांना हजारो कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर झाला होता. पैसेही थेट त्यांच्या खात्यावर वर्ग होत होते. बँकेत जायची आणि वणवण करत फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवर पाच वर्षात कधीच आली नव्हती. मात्र आज जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी एक रुपयाही मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेणारी आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची शासकीय यंत्रणा आज जिल्ह्यात राहिली नाही. पालकमंत्र्यांचे प्रशासनावर कसलेच नियंत्रण नाही. त्यांच्या निष्क्रियतेमुळेच आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली असून अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरीच त्यांना धडा शिकवतील असेही सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version