Site icon लोकाशा-बंब न्यूज

आ.पवारांची गेवराई नगर परिषद निघाली भ्रष्ट,जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब,अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर होणार कारवाई

बीड, दि.७ (प्रतिनिधी) ः- भाजपा आ.लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातील गेवराई नगर परिषदेचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. नगर परिषदेतील भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेमुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्याचा तोरा मिरविणार्या आ.पवारांचा खरा चेहरा या भ्रष्ट कारभारामुळे गेवराईकरांसमोर आला आहे. पालिकेतील भ्रष्ट कारभाराप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी केलेल्या आदेशात या बाबी उघड झाल्या आहेत. भ्रष्टाचार्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.
आर.सी.सी.पाईप, ढापे व कुंड्या खरेदी प्रक्रियेत ९७.९८ टक्के ज्यादा दराने निविदा मंजुर करणे, कचरा गोळा करण्यासाठी नवीन व जुनी गेवराई असे दोन भाग करून एकाच कामाचे दोन तुकडे करून ५७.०५ टक्के ज्यादा दराने निविदा मंजुर करणे, पालिकेकडे स्वतःच्या घंटागाड्या व सफाई कामगार असतानाही शहरातील स्वच्छता गुत्तेदारी पध्दतीने करून घेणे, विद्युत साहित्य व ब्लिचींग पाऊडर खरेदीमध्ये भ्रष्टाचार करणे, व्यापारी गाळे लिलाव प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार करणे, रस्ते डांबरीकरणाच्या कामात भ्रष्टाचार करणे यांसह पाणीपुरवठा योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात शासकीय लेखा परिक्षकांनी घेतलेल्या गंभीर आक्षेपाच्या अनुषंगाने दिलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. तक्रारीतील आक्षेपांबाबत नगर परिषदेला कोणताही समर्थनिय खुलासा करता आला नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी गेवराई नगर परिषदेचा कारभार भ्रष्ट असल्याचे नमुद करून आर्थिक अनियमिततेची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली असून या समितीच्या अहवालानंतर दोषी विरुध्द कारवाई करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. चौकशी समितीला दिलेली आठ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे.
गेवराई नगर परिषदेचा कारभार स्वच्छ, पारदर्शक आणि धुतल्या तांदळासारखा असल्याचा तोरा भाजपा आमदार आणि त्यांचे बगलबच्चे मिरवत होते. प्रत्यक्षात गेवराई नगर परिषदेत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गैरकारभाराबाबत तक्रारी देवूनही दोषीविरुध्द कारवाई होत नव्हती. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी ठोस पुराव्यासह स्वतः प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशामुळे भाजपा आ.लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातील गेवराई नगर परिषदेचा भ्रष्टाचार जनतेसमोर आला आहे. शासकीय लेखापरिक्षकांनी पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले असून दोषीविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी अमरसिंह पंडित यांनी यापूर्वीच केली आहे. गेवराई नगर परिषदेतील आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार व अनियमितता प्रकरणी दोषी विरुध्द काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मावळते नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाविरुध्द उच्च न्यायालयात दाद मागितली मात्र न्यायालयाने त्यांना कोणतीही स्थगिती दिलेली नाही.

Exit mobile version