अंबाजोगाई(प्रतिनिधी)-भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना राजकीयदृष्ट्या 2022 हे नविन वर्षे यशाचं जाणार असुन दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या दीनदयाळ पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा प्रचंड मताने विजयी झाल्या. विजयाची पताका नव वर्षाच्या सुरूवातीलाच फडकली असुन काही दिवसापुर्वी जिल्ह्यात नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्याचाही राजकिय अंदाज त्यांच्याच नेतृत्वाभोवती फिरतो आहे. दरम्यान सत्ताधारी विरोधकांनी प्राथमिक स्तरावर बँकेच्या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पारदर्शक कारभार व पंकजाताईच्या नेतृत्वाचा विश्वास ज्यामुळे विरोधकांची थोडीही दाळ शिजली नाही. विजयी निकाल हाती आला तेव्हा पंकजाताईने विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं.
या बँकेची निवडणुक जाहिर झाली तेव्हा सत्ताधारी विरोधकांनी पॅनल उभा करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला होता. मात्र एका विशिष्ट विचाराच्या मंडळींनी एकत्रित येवुन विरोधकांची दाळ शिजु दिली नाही. परिणाम म्हणुन निवडणुक पुर्व चार उमेदवार बिनविरोध निवडुन आले. ज्यात पंकजाताई यांचा समावेश होता. बँकेची स्थापना झाल्यापासुन या बँकेनी आर्थिक क्षेत्रात क्रांती करत पंडित दीनदयाळ यांच्या विचाराचा वारसा चालवत गरजुंना न्याय मिळवुन दिला. सभासदांचा विश्वास संपादन केल्याने अनेक निवडणुका बिनविरोध निघाल्या. यंदाची निवडणुक तशी पाहता बिनविरोध म्हणावी लागेल. मात्र केवळ पंकजाताईला विरोध म्हणुन विरोधकांनी सुरूवातीला पॅनल टाकण्यासाठी चाचपणी केली होती. असं असतानाही ज्यावेळी संघ परिवारातील दोन गट एकत्र आले त्यांचं नेतृत्व पंकजाताईनं स्विकारलं. 15 संचालक पदाच्या जागा पैकी चार जागा सुरूवातीला बिनविरोध निवडुन आल्या. सर्वसाधारण गटात 10 आणि ओबीसी गटात 01 एकुण 11 संचालक पदासाठी निवडणुक जाहिर झाली. त्याचं कारण एकुण 03 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. परिणामी सोमवारी परवा 02 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. एकुण मतदान सात हजार त्यापैकी 3 हजाराच्या आसपास मतदान झाले. काल येथील स्वामी विवेकानंद शिक्षक पतपेढीत मत मोजणी झाली. तेव्हा पंकजाताईच्या नेतृत्वाखालील सर्वसाधारण गटात निवडणुक लढवणार्या उमेदवारांना 2400 जवळपास मते मिळाली तर उर्वरीत मतदान अपक्षांना मिळाले. सर्वच्या सर्व संचालक दीनदयाळ पॅनलचे प्रचंड मताने निवडुन आले. खरं तर सहकारात ही बँक आदर्श म्हणुन ओळखल्या जाते. सभासदांना निवडणुक प्रक्रियाच मान्य नव्हती. पण राजकारणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध होतच असतो. निमित्य कोण कुणाला पुढे करेल सांगता येत नसतं. विरोधाला विरोध म्हणुन निवडणुक झाली पण सभासदांनी पंकजाताईच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास टाकला. नव्या वर्षाच्या सुरूवातीला जिल्ह्याच्या राजकारणात पंकजाताईच्या नेतृत्वाखाली विजयाची पताका फडकली. काही दिवसापुर्वी वडवणी, आष्टी, शिरूर, पाटोदा नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्याची मत मोजणी पंधरा दिवसांनी असली तरी बंद मतपेटीत पंकजाताईचं नेतृत्व मतदारांनी शाबुत करून ठेवलं आहे. चारही नगर पंचायतीमध्ये पंकजाताईच्या नेतृत्वाखाली भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. विजयी उमेदवारांमध्ये पंकजाताई मुंडे, सौ.शरयुताई हेबाळकर, प्राचार्य किसन पवार, किरण कांबळे, मकरंद कुलकर्णी, राजाभाऊ धाट, बाळासाहेब देशपांडे, विवेक दंडे, मकरंद पत्की, चैनसुख जाजु, अॅड. राजेश्वर देशमुख, बिपीनदादा क्षीरसागर, प्रा.अशोक लोमटे, विजयकुमार कोपले आणि राजाभाऊ दहिवाळ आदींचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजाताई मुंडेंना ओमायक्रॉनची लागण झाली असुन मुंबई निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बँक निवडणुक निकालाची माहिती मिळताच त्यांनी सर्वच उमेदवारांचे अभिनंदन केले.