Site icon लोकाशा-बंब न्यूज

सत्ताधार्‍यांच्या दबावाखालीच माझ्यावर कारवाई, तथाकथीत क्लबशी माझा कसलाच संबंध नाही, ‘ती’ जागाही माझ्या मालकीची नाही, केवळ बदनामीच्या हेतूने या प्रकरणात माझे नाव घातलेे, न्यायालयात दाद मागणार – पत्रकार परिषदेमधून राजेंद्र मस्केंनी स्पष्ट केली भुमिका


बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : चर्‍हाटा फाटा परिसरातील क्लबचा आणि माझा कसलाच संबंध नाही, ती जागाही माझ्या मालकीची नाही, केवळ बदनामीच्या हेतूने सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली माझे नाव गोवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे.
बुधवारी दुपारी साडे तीन वाजता येथील संघर्ष योध्दा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपचे जगदिश गुरखुदे, नवनाथ शिराळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मस्के म्हणाले, की मला अडचणीत आणण्यासाठी मोठे षढयंत्र रचले जात आहे. कोणतीच शहनिशा न करता केवळ ऐकिव माहीतच्या आधारे या प्रकरणात माझे नाव गोवण्यात आले आहे. या क्लबशी माझा संबंध नसतानाही नाव आल्याने विनाकारण माझी बदनामी होत आहे. सदरील जागा मदन मस्के यांच्या मालकीची असून त्यांनी इतरांना भाडे तत्वावर दिलेली आहे. संबंधित भाडेकरूने रितसर जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक विभागामार्फत सार्वजनिक मनोरंजन प्लेइंग कार्ड करिता परवाना काढलेला आहे. सदरील मनोरंजन पत्ता क्लब हा माझा नसून भाडेकरूंनी जागा भाड्याने घेऊन टाकलेला आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे पोलीस प्रशासनासमोर मांडलेली आहेत. या कागदपत्रात कुठेही माझ्या नावाचा उल्लेख अथवा संबंध नाही. याची पडताळणी पोलिस प्रशासनाने केलेली आहे. कृपया अर्धवट माहितीच्या आधारावर पत्ता क्लबच्या संदर्भातील कोणत्याही बातमीमध्ये माझे नाव गोवण्यात येऊ नये,  बीड जिल्ह्यात पंकज कुमावतांनी चालू केलेली अवैध धंद्या विरोधात सुरु केलेली धडक मोहीम  निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु ही मोहीम राबवत असताना वैध व अवैध धंद्याची पूर्ण माहिती घेऊनच कारवाई करणे उचित होईल. जिल्ह्यात अनेक प्रकारचे अवैद्य धंदे चालू असून सर्व धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेले पाऊल महत्वाचे ठरणार आहे. पोलिस प्रशासनाच्या या मोहिमेला पूर्ण समर्थन आहे. अवैध धंद्या विरुद्धची मोहीम अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी आमचे पोलिस प्रशासनाला सहकार्य असेल, मात्र चांगले काम करून पुढे जाणार्‍या कार्यकर्त्यांना सत्ताधारी जाणीवपुर्वक अडकाठी घालत आहेत, सत्ताधार्‍यांच्या दबावाखालीच या प्रकरणात माझे नाव गोवण्यात आले आहे. त्यामुळेच मी या प्रकरणी न्यायालयात जावून न्याय मागणार असल्याचेही यावेळी मस्केंनी म्हटले आहे.

Exit mobile version