बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून तेथे कार्यरत असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वाढतच जात आहेत. परंतु यापुढे कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण झाली तर ते खपवून घेतले जाणार नाही, आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत तसेच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या पोलीस चौकीमध्ये दोन शस्त्रधारी कर्मचारी उपलब्ध करून द्यावे जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण राहणार नाही. अशा सूचना आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच जिल्हा रुग्णालयाला सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त प्राप्त होईल. कोरोना काळापासून ते आजपर्यंत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता ज्या पद्धतीने रुग्णसेवा केली आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. परंतु मागील काही दिवसांपासून येथील कर्मचाऱ्यांना रुग्णांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीत वाढ झाल्याचे दिसून येते. हे नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल आणि हीच बाब लक्षात घेऊन आमदार संदीप भैया शिरसागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्राद्वारे जिल्हा रुग्णालयाला 24 तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत.