Site icon लोकाशा-बंब न्यूज

गेवराईतील ‘त्या’ दोन्ही गंभीर घटनांकडे आ. लक्ष्मण पवारांनी सरकारचे वेधले लक्ष, आ. पवार म्हणाले, अवैध वाळू उपसा अन् वाहतूकीला लगाम घाला तर गरोदर महिलेच्या प्रसूतीत हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांना कडक कारवाई केल्याशिवाय सोडू नका


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : मागच्या दोन-चार दिवसांपुर्वी गेवराई मतदार संघात दोन गंभीर घटना घडल्या, घडलेल्या या दोन्ही घटनांकडे आ. लक्ष्मण पवारांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. अवैध वाळू उपसा अन् अवैध वाहतूकीवर लगाम घालण्याबरोबरच गरोदर महिलेच्या प्रसूतीदरम्यान हलगर्जीपणा करणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकार्‍यांना कडक कारवाई केल्याशिवाय सोडू नका, अशी मागणी आ. पवारांनी केली आहे.

22 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या दरम्यान तांदळा येथील एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते, मात्र या आरोग्य केंद्रातील अधिकार्‍यांनी त्या महिलेला दाखल करून घेतले नाही, त्यामुळे त्या महिलेची प्रसूती आरोग्य केंद्राच्या प्रांगणात झाली. महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून न घेणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी आ. लक्ष्मण पवार यांनी अधिवेशनात केली असून त्यांच्या याच मागणीमुळे जिल्हा प्रशासन हलले आहे. तसेच दुसरी एक गंभीर घटना गेवराई खांबगाव या रोडवर घडली आहे. अवैध वाळू उपसा करणार्‍या ट्रॅक्टरने तुकाराम निबांळकर यांच्या चिरडले, त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अवैध वाळू उपसा आणि अवैध वाहतूकीमुळे लोकांचे जीव जात आहेत. यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मंत्री महोदयांनी दिलेले आहे, मात्र सातत्याने अशा गंभीर घटना घडत आहेत. मागच्या दोन वर्षांपुर्वीही गेवराईत अशीच घटना घडली होती, यावरूनच बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती भयाणक असल्याचे दिसून येत आहे. सरकारने लवकरात लवकर वाळूचे टेंडर काढून कमी दराने अपसेट किंमत करून टेंडर काढले तर अशा घटना टळणार असून सरकारने यावर तात्काळ निर्णय घ्यावा, अशीही मागणी आ. पवारांनी अधिवेशनात लावून धरली, दरम्यान अशा गंभीर घटना भविष्यात घडणार नाहीत, याची काळजी सरकार आणि जिल्हा प्रशासन नक्कीच घेईल, असे आ. पवारांच्या या दोन्ही मागण्यांमुळे वाटत आहे.
Exit mobile version