Site icon लोकाशा-बंब न्यूज

कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरणार, आ.सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधीवर कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे उत्तर



औरंगाबाद – राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरल्या जातील असे असे राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज (दि.28) विधान परिषदेत सांगितले. यासंदर्भात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्यातील परभणी, राहुरी, अकोला व दापोली या कृषी विद्यापीठातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जवळपास 48 टक्के तर एकट्या परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जवळपास 54 टक्के जागा रिक्त असून याचा थेट परिणाम या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांवर होत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ही रिक्त पदे कधी भरणार?, 12 ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयानुसार कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीय अधिकारी/कर्मचार्‍यांच्या शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक पात्रतेत केलेले बदल लागू करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिनियम 1990 मध्ये सुधारणा केल्यानंतरच शिक्षकवर्गीय अधिकारी/कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे या परिनियमामध्ये सुधारणा कधी करणार?, जोपर्यंत या परिनियमामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत पदोन्नती जुन्या परिनियमांप्रमाणे करणार का? असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केले.

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सदरील लक्षवेधीला उत्तर देतांना कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया त्वरित सुरू केली जाईल, सध्याच्या कृषी विद्यापीठ परिनियमांच्या आधीन राहून शिक्षकवर्गीय अधिकारी/कर्मचार्‍यांची पदोन्नती करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जी रिक्त पदे आहेत ती तासिका तत्वावर अथवा योग्य त्या मानधनावर तातडीने भरण्यात येतील असे सभागृहात सांगितले. या चर्चेत आ.शशिकांत शिंदे, आ.अनिकेत तटकरे यांनी देखील सहभाग घेतला…

Exit mobile version