गेवराई : जिनिंगमधील मुख्य तिजोरीत ठेवलेली जवळपास 48 लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. हि घटना परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथील पोर्णीमा काँटन जिनिंग अँन्ड प्रेसिंग फॅक्टरी येथे घडली असून या घटनेने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तर जिनिंग मालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, ओंकार उत्तमराव खुर्पे (वय 40 वर्ष) हे माजलगाव येथील रहिवासी असून त्यांच्या मालकीची परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथे पोर्णीमा काँटन जिनिंग अँन्ड प्रेसिंग फॅक्टरी आहे. या कॉटन जिनिंग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदी करुन कापसापासुन सरकी वेगळी करुन रुईच्या गाठी तयार करण्याचा व्यवसाय चालतो. यानंतर तयार गाठी विक्री करतात. त्यासाठी शेतक-यांचा कापूस खरेदी केला जातो. फॅक्टरीमध्ये कर्मचा-यांसाठी सहा रुमचे बांधकाम केलेले आहे. त्यामध्ये एका रुममध्ये किचन आहे. एका रुममध्ये कार्यालय व एका रुममध्ये मुख्य तिजोरी आहे, ईतर रुम राहण्यासाठी उपयोगात आहेत. तर जिनिंगच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परळी या बँकेचे खाते आहे. दरम्यान शनिवार व रविवार या दोन दिवस सलग बँकेला सुट्टी असल्याने कापूस खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरीचे कॅशीअर अशोक भिमराव साळुंके व त्यांचे सोबत निलेस विलासराव देशमुख यांनी परळी येथे जाउन दि.24/12/2021 रोजी चेक क्र. 273335 ने 50 लाख काढून आणले होते. सदर रक्कम मधुन काही रक्कम कँशीयर साळुंके यांनी त्याच दिवशी शेतक-यांना वाटप केली होती. तर रात्रीला हिशोब करुन शिल्लक रक्कम 47 लाख 78 हजार 400 पैकी 45 लाख रु. हे मुख्य लोखंडी तिजोरीत लाँक करुन ठेवले होते. उर्वरित 2 लाख 78 हजार 400 रु. समोरीलच रुमच्या लोखंडी कपाटामध्ये ठेवले होते. दरम्यान दि.25/12/2021 रोजी रात्री 03.18 वाजण्याच्या सुमारास ग्रेडर कारभारी कचरु हारकाळ यांनी जिनिंग चालक ओंकार खुर्पे यांना फोनद्वारे कळविले की, दोन्ही तिजोरीतील रक्कम 47 लाख 78 हजार 400 रु. कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी पंचनामा करुन ओंकार खुर्पे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.