दिल्ली,दि.25(लोकाशा न्युज)ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस लागू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. लवकरच देशात अनुनासिक आणि डीएनए लसही सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वी, डीसीजीआयने लहान मुलांच्या लसीसाठी कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
आरोग्य कर्मचार्यांसाठी बूस्टर डोस सुरु करण्यात येणार असल्याचीही घोषणा मोदी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला घाबरू नका, सतर्क राहा असे आवाहन केले आहे. ते म्हणाले की नवीन संसर्गास घाबरू नका, परंतु प्रतिबंध आणि कोविड नियमांचे पालन करा. याशिवाय पंतप्रधानांनी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि लसीकरणाबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोंदींनी सांगितले, 1 लाख 40 हजार आयसीयू बेड आहेत. सर्व काही एकत्र केले तर मुलांसाठी 90 हजार विशेष बेड आहेत. 3000 हून अधिक पीएस ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत. 4 लाख ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत. भारताने लसीच्या 141 कोटी डोसचे अवघड उद्दिष्ट पार केले आहे. किमान 90% प्रौढ लोकसंख्येला लसीचा एक डोस देण्यात आला आहे.