Site icon लोकाशा-बंब न्यूज

टीईटी घोटाळा: तुकाराम सुपेच्या घरात दीड कोटींची रोकड आणि दीड किलो सोने; पुणे पोलिसांची कारवाई

पुणे: आरोग्य भरती, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेला राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्या घरी पुणे पोलिसांनी (Pune Police) दुसरा छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी दीड कोटी रुपयांची रोकड आणि दीड किलोचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
टीईटी परीक्षेत ८०० विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्यासाठी तुकाराम सुपे व शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर या दोघांना ४ कोटी २० लाख रुपये मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यातील १ कोटी ७० लाख रुपये सुपे यांना मिळाले होते. सुपे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी ८८ लाख ४९ हजार रुपयांची रोकड, पाच ग्रॅमचे सोन्याचे नाणे, पाच तोळे दागिने, साडेपाच लाख रुपयांच्या मुदत ठेवीची कागदपत्रे त्यांच्याकडं आढळली होती. मात्र, पोलिसांनी झडत घेण्याच्या आधीच सुपे याची पत्नी आणि मेहुण्याने काही रक्कम दुसरीकडे ठेवली होती. पोलिसांनी दुसऱ्यांदा छापा टाकून घेतलेल्या झडतीत १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि दीड किलोचे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याविषयी माहिती दिली. ‘या प्रकरणात अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. पोलिसांचा तपास पेपरफुटी पर्यंत मर्यादित आहे. वेगवेगळ्या माहितीच्या आधारे तपास सुरू आहे, असं गुप्ता यांनी सांगितलं.

Exit mobile version