बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : येत्या सोमवारपासून झेडपीचा कारभार नव्या ईमारतीमधून चालणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सीईओ, एसीईओ, डेप्टी सीईओंच्या केबीनसह झेडपीचे पाच विभाग नव्या ईमारतीमध्ये हलविण्यात येणार आहेत. याअनुषंगानेच मंगळवारी सीईओ अजित पवार, एसीईओ वासूदेव सोळंके, कार्यकारी अभियंता हळीकर यांनी नव्या ईमारतीला भेट देवून पाहणी केली आहे.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या काळात बीड जिल्हा परिषदेची ईमारत उभी झाली, पुढे या ईमारतीच्या उर्वरित कामाला अध्यक्षा शिवकन्या सिरसाट आणि बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांनी गती दिली. या ईमारतीचे काम गतीने करण्यास तत्कालिन सीईओ अजित कुंभार आणि आताचे सीईओ अजित पवार यांचेही मोठे योगदान आहे. सदर ईमारतीमधील काही काम आणखी बाकी आहे, मात्र ज्या मजल्याचे काम पुर्ण झाले आहे त्या मजल्यावर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकार्यांच्या केबीनसह पाच विभाग हलविण्यात येणार आहेत. त्यामुळे अध्यक्ष शिवकन्या सिरसाट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांच्यासह इतर सभापती, सीईओ अजित पवार, अतिरिक्त सीईओ वासूदेव सोळंके, डेप्टी सीईओ तसेच बांधकाम एक, बांधकाम 2, पंचायत, वित्त आणि आस्थापना या पाच विभागाचा कारभार सोमवारपासून या नव्या ईमारतीमधून चालणार आहे. याअनुषंगानेच मंगळवारी सकाळी या नव्या ईमारतीचे सीईओ अजित पवार आणि अतिरिक्त सीईओ वासूदेव सोळंके यांनी पाहणी केली आहे, तसेच सदर विभाग स्थलांतर करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. दरम्यान पाच विभाग नव्या ईमारतीमध्ये जाणार असल्यामुळे आरोग्य विभाग बांधकाम विभागाच्या जुन्या ईमारतीत तर डीआरडी विभाग कन्या शाळेत आणला जाणार आहे.
सोमवारपासून झेडपीचे काम चालणार नव्या ईमारतीतून, पदाधिकारी, सीईओ, एसीईओंच्या केबीनसह पाच विभाग जाणार नव्या ईमारतीत, आरोग्य विभाग बांधकाम विभागाच्या जुन्या ईमारतीत तर डीआरडी विभाग येणार कन्या शाळेत, ईमारतीची पाहणी करून सीईओ, एसीईओंनी केले नियोजन
