पुणे, दि. 7 (लोकाशा न्यूज) : आरोग्य विभागाच्या पेपर फूटीप्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश करत लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकार्यासह पाचजणांना अटक केली. यात डॉक्टर, शिक्षकाचा समावेश आहे. आतापर्यंत या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय 50, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, जि. बीड), डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय 36, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, जि. बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय 36, रा. तितरवणे, ता. शिरूर कासार, जि. बीड), शाम महादू म्हस्के (वय 38 ,रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय 51, रा. शामनगर, जि. बीड) यांना अटक केली आहे. यापूर्वी विजय मुर्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक केली होती. आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दिली आहे. आरोग्य विभागाच्या गट ड परिक्षेचा पेपर फुटला होता. या गुन्ह्याचा तपास सायबर गुन्हेकडून सुरू होता. तांत्रिक तपासावरून प्रथम विजय मुर्हाडे याला अटक केली होती. त्यानंतर इतर आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतरच्या तपासात या पाच जणांचा समावेश आढळून आला आहे. त्यांना मंगळवारी (7 डिसेंबर) अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके, उपनिरीक्षक अमोल वाघमारे यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास केला जात आहे. उद्धव नागरगोजे हे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक आहेत. तर, डॉ. संदीप हे आंबेजोगाई येथील मनोरुग्णालयात डॉक्टर आहेत. तसेच, शाम म्हस्के हे बीडच्या रुग्णालयात नोकरी करत. राजेंद्र सानप हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील सहाय्यक अधिक्षक ग्रामीण रुग्णालयात आहेत. त्यामुळे आता मोठा घोटाळा उघडा होणार आहे.
आरोग्य परिक्षेच्या झारीतले पापी अखेर सापडले, याही घोटाळ्यात बीड पुढेच, बीड जिल्ह्यातील पाच जणांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, अटक केलेल्यांमध्ये आरोग्य विभागातील दोन अधिकारी, एक कर्मचारी, एक डॉक्टर अन् एका शिक्षकाचा समावेश
