परळी । दिनांक ०१।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शहरातील महिलांना सामाजिक व सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून देणारी ‘कमल सखी मंच’ ही अनोखी संकल्पना राबवली आहे. भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या परिवारातील महिला सदस्यांना ओळखपत्र देऊन त्यांनी या संकल्पनेची आज सुरवात केली.
शहरातील भाजप परिवारातील व इतर महिला कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी ‘कमल सखी मंच’ हा अभिनव आणि अराजकीय उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ‘तुमचे-माझे, नाते सखीचे’ असं ब्रीद घेऊन पंकजाताई मुंडे सखींना सामाजिक व सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या उपक्रमामार्फत करणार आहेत. भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन या उपक्रमाची सुरवात करायची असा मानस ठेवला होता त्यानुसार ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रकाश जोशी यांच्या घरी जाऊन पंकजाताईंनी महिला सदस्यांना ओळखपत्र दिले. यावेळी नगरसेविका उमाताई समशेट्टे, सुचिता पोखरकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, महादेव इटके आदी उपस्थित होते.
मैत्रीचा धागा जोडण्यासाठी मंच
कमल सखी मंचाविषयी अधिक माहिती देताना पंकजाताई म्हणाल्या की, मी अनेक वर्षांपासून विविध कार्यकर्त्यांच्या घरी जाते. त्यावेळी घरातील महिला चहा-पाण्यातच व्यग्र असतात. पण या महिलाही माझ्या मैत्रिणी आहेत. त्यांना एका मंचावर जोडण्याचा यामागे हेतू आहे. महिलांनी स्वतःचा फोटो, शिक्षण, नाव आदी माहिती याअंतर्गत नोंदवायची आहे. याद्वारे 5 -10 हजार मैत्रिणींचा संचय होईल. याद्वारे आम्ही महिलांना आधार देण्याचा प्रयत्न करू. यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. या मंचाद्वारे हळदी कुंकू, एकत्र गप्पा, असे कार्यक्रम घेतले जातील,’ अशी माहिती पंकजाताई मुंडे यांनी दिली.
••••