Site icon लोकाशा-बंब न्यूज

वैद्यनाथ कारखान्याचा बाॅयलर प्रज्वलित ; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आनंद,शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी कारखाना सुरू केला – पंकजाताई मुंडे,कारखाना सर्वांचाच ; राजकारण करून अडथळा होणार नाही असेच सर्वांनी वागावे

परळी ।दिनांक ३०।
वैद्यनाथ साखर कारखाना लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आत्मा आहे, त्यांचे नांव याच्याशी जोडले गेले आहे. हा कारखाना सर्वाचाच आहे, शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये म्हणून आर्थिक अडचणींचा सामना करत मी हा कारखाना सुरू करतेयं. तथापि, यात कुणीही राजकारण करता कामा नये. अडचण निर्माण होणार नाही असेच सर्वांनी वागावे असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

वैद्यनाथ साखर कारखान्याचा २१ वा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज अतिशय साध्या पध्दतीने मोठया उत्साहात पार पडला, त्यावेळी सभासद शेतकऱ्यांसमोर त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, वैद्यनाथ साखर कारखाना हा सभासद, शेतकरी आणि कर्मचारी असा सर्वांचाच आहे. गेल्या कांही वर्षापासून साखरेचे दर कोसळल्याने व दुष्काळामुळे कारखाना आर्थिक संकटाला सामोरा जात आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, त्यांचे मनोबल खचू नये आणि कारखाना सुरू व्हावा यासाठी ‘आऊट ऑफ वे’ जाऊन मी प्रयत्न केले. आता सर्व अडचणींवर मात करून कारखाना सुरू करत आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या मनात ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये केवळ यासाठीच गळीत हंगाम सुरू केला असल्याचे पंकजाताई म्हणाल्या.

राजकारण करून अडथळा आणू नका

राजकारणाच्या मंचावर राजकारण करा पण ऊसात राजकारण करून वैद्यनाथच्या शेतकऱ्यांना कृपा करून अडचणीत आणू नका असं पंकजाताई म्हणाल्या. कारखान्यात माझा कसलाही स्वार्थ नाही, मुंडे साहेबांचे नांव याच्याशी जोडले गेलेले आहे. करायची असेल तर मदत करा पण अडचण येईल असं काही करू नका, नाही तर सगळ्या अफवांचा परिणाम शेतकऱ्यांवर होईल. ज्या कारखान्याने आपल्याला वैभव मिळवून दिले, त्याला सर्वांनी मिळून उभा केलं पाहिजे. यंदाचा गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पाडा आणि जास्तीत जास्त ऊस गाळपास आणून सहकार्य करा असे आवाहन करून भविष्यात येणाऱ्या अडचणींना सर्व मिळून सामोरे जाऊ असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

प्रारंभी कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे यांच्या हस्ते सकाळी सपत्नीक बाॅयलर संचाची विधीवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार तथा संचालक आर टी देशमुख, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, कारखान्याचे संचालक सर्वश्री श्रीहरी मुंडे, व्यंकटराव कराड, त्रिंबकराव तांबडे, गणपत बनसोडे, श्रीराम मुंडे, कार्यकारी संचालक जी पी एस दीक्षितूलू आदींसह सभासद शेतकरी, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
••••

Exit mobile version