Site icon लोकाशा-बंब न्यूज

सकाळच्या राड्यानंतर शरद पवार पोहोचले साताऱ्यात, शशिकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमुळे राष्ट्रवादीमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहे. शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे लगेच साताऱ्यात दाखल झाले असून शशिकांत शिंदे यांना चर्चेसाठी बोलावलं आहे.
राष्ट्रवादी कार्यालयावरच कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. या घडामोडींची दखल खुद्द शरद पवारांनी तातडीने घेतली आहे. त्यामुळे संध्याकाळी शरद पवार साताऱ्यात दाखल झाले. साताऱ्यातील विश्रामगृहावर आमदार शशिकांत शिंदे यांना बोलून घेण्यात आलं. आता शरद पवार आणि शिंदे यांच्या सोबत बंददाराआड चर्चा सुरू आहे. शरद पवार साताऱ्यात दाखल झाल्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. दरम्यान, सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर दगड फिरकावला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पत्रकारांनी अजित पवार यांना याबद्दल विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘ही घटना घडल्यानंतर मी ताबडतोब पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, ५ ते ६ लोक होती, त्यांना लगेच काही जणांना ताब्यात घेतले आहे. आता त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. के कोण होते, त्यांनी हे कृत्य का केले याचा तपास करत आहे’ अशी माहिती अजित पवारांनी दिली. तसंच, कोणत्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश असतं. सगळेच निवडणूक येतात अशातला भाग नाही. तिथे जी निवडणूक झाली तिथे राष्ट्रवादीत बंडखोरी होती’ अशी कबुली अजित पवारांनी दिली. ‘मुळात ती काही पक्षिय निवडणूक नव्हती. तिथे जे काही पॅनल होते त्यात इतरही राजकीय पक्षाचे आमदार आणि खासदार तिथे होते. सहकारातील निवडणूक ही पक्षीय स्तरावर लढवली जात नाही. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिक संस्था चांगली चालावी या दृष्टीकोनातून ही निवडणूक चालत असते’ असंही पवार म्हणाले. 

नेमकं काय घडलं?
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashiknat Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
​​

Exit mobile version