Site icon लोकाशा-बंब न्यूज

राष्ट्रवादीच्या ताब्यातील परळी पंचायत समितीत सर्रास नियमबाहय कामे !,भाजपच्या ग्रामपंचायतीची कामे करतांना मात्र खोडसाळपणा ; विकासात भेदभाव होत असल्याची तक्रार,सरपंचांच्या शिष्टमंडळाने घेतली पंकजाताई मुंडे यांची भेट

परळी ।दिनांक १५।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीत सर्रास नियमबाहय कामे करून बिलं काढण्याचा प्रकार होत आहे. शासकीय योजनांची कामे करतांना भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतीवर जाणीवपूर्वक भेदभाव करून अन्याय केला जात असून याची चौकशी करण्याची मागणी विविध गावच्या सरपंचांनी केली आहे, यासंदर्भात सरपंचांच्या शिष्टमंडळाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

परळी मतदारसंघातील २५१५, नरेगा, पीएम आवास, रुरबन व तीर्थक्षेत्र विकास आदी कामाच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या ताब्यातील पंचायत समितीकडून भाजपच्या अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीची कामे जाणीवपुर्वक खोडसाळपणा करून अडवली जात आहेत. मनरेगा अंतर्गत येणारी कामे, सिंचन विहीर, गायगोठा, पांदण रस्ते, गॅबियन बंधारे, शोषखड्डे आदी कामे सत्ताधाऱ्यांची होतात पण गटविकास अधिकारी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली येऊन भाजपच्या ग्रा.प. ची कामे करत नाहीत, तसेच नियम डावलून विहीरी व गायगोठे व इतर कामे सत्ताधाऱ्यांची मंजूर केली जात आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील (घरकुल) यादीमध्ये भाजपच्या लाभार्थ्यांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात आहेत. रुरबन कामाचे टेंडरचे अधिकार ग्रामपंचायतला मिळाले पाहिजेत. संबंधित कामाचे अधिकार ग्रामपंचायतकडून काढून घेत असल्याच्या हालचाली दिसत आहेत असे सरपंचांनी म्हटले आहे.

१६ ऑगस्ट २०१९ ची प्रशासकीय मान्यता क्र १०२८ च्या अंतर्गत येणाऱ्या १४१ कामांची वर्क ऑर्डर होवुन व कामे पुर्ण होवुन देखील त्यांचे बिल अद्यापपावेतो मिळाले नाहीत. तसेच सदर प्रशासकीय मान्यतेतील कामे रद्द झालेली आहेत असे सांगण्यात येत आहेत. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मौजे डाबी, येथील टेंडर होवुनही निधी वितरीत होत नाही. राष्ट्रवादीकडून भाजपची कामे करतांना भेदभाव होत असुन याची मंत्रालय स्तरावर सखोल चौकशी करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सरपंचांनी केली आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे तसेच सरपंच सर्वश्री विनायक गुट्टे, चंद्रकांत मुंडे, अतुल मुंडे, अशोक कदम, अनिल गुट्टे, सत्वशीला ढाकणे, गंगाधर सातपुते, ज्ञानोबा साबळे, राधाबाई साबळे, रामेश्वर कदम, कृष्णा सलगर, उर्मिला दहिफळे, पार्वती मुंडे, नवनाथ मुंडे, मनोहर देवकते, शिवराज मुंडे, राजेंद्र नागरगोजे, वैजनाथ कराड आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
••••

Exit mobile version