नेकनूर, दि. 13 (लोकाशा न्यूज) : चौसाळ्याहून धुळ्याला एका ट्रकद्वारे 15 लाख रुपयांचे सोयाबीन पाठविण्यात आले होते. मात्र सदरील हे सोयाबीन धुळ्याला पोहचले नसल्याचे व्यापार्याच्या लक्षात आल्यानंतर व्यापार्याने याबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ट्रान्सपोर्ट मालक व गाडी चालक आणि ट्रक मालकाविरोधात गुन्हा दाखल केला, त्यानुसार 15 लाखाचं सोयाबीन लंपास करणार्या तिघांना एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पळवून नेलेली सोयाबीनही जप्त करण्यात आली आहे.
अंगद शेषेराव नाईकवाडे (रा. सुलतानपूर, चौसाळा) यांनी चौसाळ्याहून धुळ्याला ट्रक (क्र. एम.एच. 20 सी.टी. 2825) यामध्ये 15 लाखांचे सोयाबीन 5 नोव्हेंबर 2021 रोजी पाठविले होते. सदरील हे सोयाबीन धुळ्याला पोहचलेच नाही. याबाबत व्यापारी अंगद नाईकवाडे यांनी चौकशी केली असता सदरील प्रकरणात फ्रॉड झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत ट्रान्सपोर्ट मालक अर्जुन आसाराम कुडके, ट्रकमालक शेख अख्तर रशीद (रा. गांधीनगर, बीड) व ट्रक चालक शेख जुबेर नजीर (रा. बीड) या तिघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार नेकनूर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला,
तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांनी या प्रकरणातील त्या तीन लुटारूंना गजाआड केले आहे. विशेष म्हणजे पळवून नेलेली सोयाबीनही धर्मापुरीतून जप्त करण्यात आली आहे. एलसीबीने केलेल्या या कारवाईचे कौतूक केले जात आहेत. प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा यांच्या मार्गदर्शनाखाली विलास जाधव हे करत आहेत.
15 लाखांंचं सोयाबीन लंपास करणार्या लुटारूंच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या, धर्मापुरीतून पंधरा लाखाच्या सोयाबीनसह टेम्पो केला जप्त
