बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : सीईओ अजित पवार हे प्रत्येकाला न्याय देणारे अधिकारी आहेत. त्याअनुषंगानेच त्यांनी जिल्हा परिषदेमधील अनेकांना पदोन्नती देवून त्यांची दिवाळी गोड केली आहे. आता त्याचबरोबर त्यांनी अनुकंपाधारकांनाही न्याय देवून त्यांची दिवाळी गोड केली आहे. त्यांच्या एका निर्णयामुळे प्रतिक्षा यादीमधील 57 अनुकंपाधारकांची जिल्हा परिषदेमधील विविध पदांवर वर्णी लागली आहे. यासाठी त्यांनी स्वत: 154 उमेदवारांचे समुपदेशन घेतले आहे. यावेळी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे हे स्वत: उपस्थित होते.
शनिवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे जिल्हा परिषद अनुकंपा प्रतीक्षा यादीतील 57 उमेदवारांची समुपदेश पद्धतीने जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील 154 उमेदवारांचे समुपदेशन घेण्यात आले. उमेदवारांचा प्रतीक्षा यादीतील जेष्ठता क्रम, शैक्षणिक पात्रता,जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदे विचारात घेऊन निवड करण्यात आली आहे. समुपदेशन प्रक्रियेस सीईओ अजित पवार हे स्वतः उपस्थित होते.तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे आणि जिल्हा परिषद चे विभागप्रमुख उपस्थित होते.मा अध्यक्ष जिल्हा परिषद,मा उपाध्यक्ष जिल्हा परिषद ,मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनुकंपा धारकांना नियुक्ती देऊन त्यांची दिवाळी अधिक गोड करण्याचा संकल्प केला होता.दिवाळी च्या मुहूर्तावर निवड झाल्याने अनुकंपा धारक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निवड प्रक्रिया उमेदवारांचे समक्ष झाल्याने ती पारदर्शकपणे पार पडली. मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्णय क्षमतेचा आणि कामाच्या गतीचा व अचुकतेचा या वेळी सर्वाना प्रत्यय आला. त्यामुळे अनुकंपा समुपदेशन केवळ 2 तासात पार पडले. समुपदेशन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री राजपूत,कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री राठोड आणि इतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतल्याचे दिसून आले. यामध्ये तीन विस्तार अधिकारी (सा), एक औषध निर्माण अधिकारी, चार वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), तीन वरिष्ट सहाय्यक (लेखा), दोन पशुधन पर्यवेक्षक, एक ग्रामसेवक (कंत्राटी),17 कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), एक कनिष्ठ अभियंता, 25 परिचर अशा एकूण 57 जणांचा समावेश आहे.
अनुकंपाधारकांचीही दिवाळी गोड, प्रतिक्षा यादीमधील 57 उमेदवारांची जिल्हा परिषदेमध्ये लागली वर्णी
