Site icon लोकाशा-बंब न्यूज

सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, तेलगाव येथील घटना


माजलगाव : हुंड्यातील बाकी राहिलेले २ लाख रुपये माहेरहून घेऊन येण्यासाठी सासरच्या लोकांनी अवघे चार महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा अनन्वित छळ केला . सततची मारहाण आणि छळाला कंटाळून अखेर त्या विवाहितेने गुरुवारी ( दि . २१ ) माहेरी तेलगाव ( ता . धारूर ) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या पतीसह सासू , सासरा , दिर आणि नणंदेवर दिंद्रुड ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला . प्रतीक्षा राहुल राऊत – डुकरे ( वय २२ , रा . मनुर , ता . माजलगाव ) असे त्या मयत – विवाहितेचे नाव आहे .

प्रतीक्षाचे वडील संतोष मारोती लगड यांच्या फिर्यादीनुसार , तिचे लग्न यावर्षी ४ जून रोजी राहुल रामराव राउत ( डुकरे ) ( रा . मनुर , ह.मु. माजलगाव ) याच्यासमवेत झाले . लग्नाच्या वेळी हुंड्यातील २ लाख रुपये देऊन उर्वरित ३ लाख दिवाळीपर्यंत देण्याचे ठरले होते . सुरुवातीचा एक महिना चांगला गेल्यानंतर हुंड्यात राहिलेल्या तीन लाखांसाठी पती राहुल , सासरा रामराव आश्रुबा राऊत , सासू सुदामती , दिर वैभव आणि नणंद पुजा यांनी तिचा छळ सुरु केला . तिला मारहाण करून उपाशी ठेऊ लागले . त्यामुळे संतोष लगड यांनी उसनवारी करून एक लाख रुपये जमा केले आणि ५ सप्टेंबर रोजी प्रतीक्षाच्या सासरी नेऊन दिले . मात्र , त्यानंतर चारच दिवसांनी उर्वरित दोन लाखांसाठी प्रतीक्षाला बेदम मारहाण झाली . त्या मारहाणीमुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले . त्यानंतर संतोष लगड तिला माहेरी घेऊन आले . घरी आल्यावरही प्रतीक्षाने सासरच्या जुलुमाचा पाढा वाचला . अखेर सततच्या छळाला कंटाळलेल्या प्रतीक्षाने माहेरी असताना वडील , आई , भाऊ शेतात गेल्याची संधी साधून गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास राहत्या घरी लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली . सदर फिर्यादीवरून राहुल रामराव राऊत ( डुकरे ) , रामराव आश्रुबा राऊत , सुदामती रामराव राऊत , वैभव रामराव राऊत आणि पूजा रामराव राऊत यांच्यावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला .

Exit mobile version