नवी दिल्ली । दिनांक १९।
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र सध्या अडचणीत असून साखर उद्योगांकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक बनला आहे. साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी वेगळं पॅकेज देण्याची गरज असल्याचं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.
पंकजाताई मुंडे सध्या दिल्लीत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक काल दिल्लीत पार पडली, या बैठकीस त्या उपस्थित होत्या. आज सकाळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी वार्तालाप केला.
राज्यातील सहकार क्षेत्राविषयी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची आजची बैठक महत्वाची ठरणार असल्याचे त्या म्हणाल्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, राज्यातील साखर उद्योग सध्या दुष्काळ, साखरेचे दर आणि अन्य समस्यांमुळे खूप अडचणीत आहे. मी ही त्यातून जात आहे. मध्यंतरी साखर आणि इथेनाॅलचे दराबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांगले प्रयत्न केले होते, त्यांचे योगदान महत्वाचे होते. साखर उद्योगाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे, या उद्योगावरील कर्जाचा डोंगर कमी करतांना करकपात झाली पाहिजे. निवडणूकांसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी कारखाने चालू राहिले पाहिजेत. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे त्या म्हणाल्या. शेती, उद्योगांना वेगळी वागणूक द्यायला नको असेही त्यांनी सांगितले.
ऊसतोड कामगारांना भेटणार
आम्ही सत्तेत असतांना ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ केले, आता कामगारांची नोंदणी सुरू झाली आहे, ही चांगली बाब आहे. लवकरच त्यांच्या गाठी-भेटीचा दौरा करणार आहे. कामगारांच्या योजना फक्त कागदावरच न राहता त्यांच्या आरोग्याचा, निवासाचा, विम्याचा प्रश्न सुटला पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे.
आरक्षणावरून महाराष्ट्रातील जनतेत संताप
ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रातील जनतेत तीव्र संताप आहे. मराठा आरक्षण देखील रद्द झाले आहे, त्यांचेसमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही आरक्षणावरून सध्या प्रचंड नाराजी आहे, हा प्रश्न लवकरात लवकर सरकारने निकाली काढावा असे त्या म्हणाल्या.
मध्यप्रदेशात प्रचाराला जाणार
भाजपची काल संघटनात्मक बैठक झाली, यात पक्षांतर्गत विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. मध्यप्रदेशात लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे, दोन दिवसानंतर तिकडे प्रचारासाठी जाणार असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी बोलतांना सांगितले.
••••
