Site icon लोकाशा-बंब न्यूज

..त्यामुळे मोठीही होत नाही आणि लहानही, शरद पवारांच्या वक्तव्यावर पंकजाताईंचे प्रत्यूत्तर


मुंबई, दि. 17 (लोकाशा न्यूज) : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. दसरा मेळावा आणि त्यानंतर सत्ताधारी तसंच विरोधक यांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले होते. दरम्यान, पंकजाताईं मुंडे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
सरकार पाडीपाडीच्या चर्चेपेक्षा जनतेची कामे करा, असे भाष्य दसरा मेळाव्यात पंकजाताईंनी केले होते, यावर शनिवारी शरद पवारांनी पंकजाताईंच्या या भाष्यावर प्रतिक्रीया दिली. तर रविवारी पवारांच्या प्रतिक्रियेवर पंकजाताईंनी उत्तर दिले. शरद पवार यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना त्यांच्या बोलण्यानं आपण लहान होत नाही आणि मोठीही होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठीकाला जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  मी शरद पवार यांचं वक्तव्य ऐकलं नाही परंतु मोबाईलवर पाहिलं. ते जे बोलले ते खरं आहे. मी मोठी नेता नाही. मी लहान आहे आणि मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे आणि प्रोत्साहनही दिलं पाहिजे. पण त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मी लहान होत नाही आणि मोठीही. मी तेवढीच राहणार आहे. ते आमच्यापेक्षा मोठे नेते आहेत यात काही वादच नाही, असंही पंकजाताई म्हणाल्या आहेत.

Exit mobile version