Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपालांची भेट,अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई , विमा अन् बीडमधील ‘माफिया राज’ बंद करण्याबाबत दिले निवेदन

मुंबई । दिनांक ११।
बीडसह मराठवाडयातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना विमा मिळावा आणि बीड जिल्हयातील ‘माफिया राज’ संपुष्टात आणावा या मागणीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी रविवारी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने बीडसह मराठवाडयातील सर्वच जिल्हयातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अतिवृष्टीत काढणीला आलेली पिके संपूर्ण उध्वस्त झाली असून जमिनीची माती वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी पशूधन वाहून गेली तर अनेकांना यात आपला प्राण गमवावा लागला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठीण काळात शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची गरज असल्याने त्यांना तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा अशी मागणी यावेळी पंकजाताई मुंडे यांनी राज्यपालांकडे केली.

बीडमध्ये माफिया राज!

बीड जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनात मोठी वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. कायद्याचा कसलाही धाक गुन्हेगारांना राहिला नाही. माफियांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत आहे, हा माफिया राज बंद करावा असेही पंकजाताई मुंडे यावेळी म्हटले. राज्यपाल कोश्यारी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
••••

Exit mobile version