बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून आठ पॅकेजची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून 43 कोटी 22 लाख 14 हजार रूपये मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यानुसार 43 कोटींच्या या कामांची एक एक प्रक्रिया पुर्ण होताना दिसून येत आहे. या कामांची तांत्रिक तपासणी पुर्ण झाली असून लवकरच या कामांची वर्कऑर्डर निघणार आहे. दरम्यान खा. प्रीतमताईंच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या कामांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.
केंद्र सरकार विकासाच्या बाबतीत मोठी गती घेत आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात खा. प्रीतमताई मुंडे ह्या अत्यंत गतीने विकासाची कामे जिल्ह्यात राबवित आहेत. त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळेच बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची मोठी कामे झाली आहेत आणि सध्याही होत आहेत. याबरोबरच खा. प्रीतमताईंना ग्रामीण भागातील रस्ते उभारण्यातही मोठे यश येत आहे. त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्राने बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आठ पॅकेजसाठी 43 कोटी 22 लाख 14 हजार रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. या निधीमधून आष्टी तालुक्यात चार, बीड तालुक्यात एक, गेवराईत एक आणि केज तालुक्यासाठी दोन पॅकेजचे रस्ते मंजूर करण्यात आलेले आहेत. या कामाची सर्व प्रक्रिया सध्या गतीने होत असून तांत्रिक तपासणी पुर्ण झालेली आहे. यानंतर आर्थिक लिफाफा उघडून त्याचा प्रस्ताव शासनाला निविदेच्या मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्व कामांची वर्कऑर्डर काढण्यात येणार आहे.
प्रत्येक प्रक्रियेवर खा. मुंडेंचे
बारीक लक्ष
केंद्र सरकारने जाहिर केलेल्या रस्त्यांच्या या आठ पॅकेजमुळे ग्रामीण भागातील अनेक गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत. त्यामुळेच या रस्त्यांची कामे गतीने व्हावेत, याअनुषंगानेच खा. प्रीतमताईंचे या रस्त्यांच्या प्रत्येक प्रक्रियेवर बारीक लक्ष आहे. खा. प्रीतमताईंमुळे अगदी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग जसे झाली अगदी तशीच हेही रस्ते होतील असा विश्वास संपूर्ण जिल्हावासियांना आहे.