Site icon लोकाशा-बंब न्यूज

झोपलेले आघाडी सरकार कधी जागे होणार, निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी आ. नमिता मुंदडांनी केले अन्नत्याग, ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी; आंदोलनात राजेंद्र मस्केंसह शेकडो शेतकर्‍यांचा सहभाग



अंबाजोगाई, दि. 4 (लोकाशा न्यूज) : ढगफुटीसह झालेल्या अतिवृष्टीने केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. तरी देखील शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अद्याप कसलीही मदत दिली नाही. त्यामुळे सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, पीकविमा तातडीने द्यावा आणि शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी या मागण्यांसाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी सोमवारी (दि.04) अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करून निद्रिस्त सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. आ. मुंदडा यांच्या समवेत शेकडो शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीही या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला होता.
अतिवृष्टीमुळे केज मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतीची जमीन खरडून गेल्याने सोयाबीन, ऊस व खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांची शेकडो पाळीव जनावरे, हजारो कुकुट पक्षी अतिवृष्टीमुळे मृत पावलीत. जमीन, पिक तर गेलेच परंतु त्यासोबतच शेतातील पाईपलाईन, मोटारी, ठिबक, तुषारचे संच, इतर मशिनरी हे सर्वच वाहून गेल्याने  शेतकर्‍यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या घरांसह रस्ते, पूल, बंधारे, विद्युत खांब यांचेही प्रचंड नुकसान झाले. एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती येऊनही आणि शेतकरी पूर्णतः उध्वस्त झालेला असूनही अद्याप राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्यासाठी कुठलीही मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकर्‍यांना लवकरात लवकर 2020 व 2021 चा पीक विमा देण्यात यावा. त्याचप्रमाणे नुकसान भरपाईसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी या मागण्यांसाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी सोमवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनात केज मतदार संघातील शेकडो शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केही सहभागी झाले होते

पालकमंत्र्यांच्या मागणीची करून दिली आठवण
काही वर्षापूर्वी विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे यांनी विधानभवनासमोर आंदोलन करून ओला दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी तत्कालीन भाजप सरकारकडे केली होती. त्या आंदोलनची आठवण करून देत आ. मुंदडा यांनी आताही तीच मागणी ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सरकारकडून मान्य करून घ्यावी असे आवाहन केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची उपस्थिती
भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीही आंदोलनात सहभागी होत समर्थन दिले. यावेळी नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, रामभाऊ कुलकर्णी, ऋषीकेश आडसकर, भगवानराव केदार, अच्युत गंगणे, विजयकांत मुंडे, रमाकांत मुंडे, विष्णू घुले, तपसे काका, सुदाम पाटील, डॉ. नेहरकर, मुरली बप्पा ढाकणे, मधुकर काचगुंडे, डॉ. अतुल देशपांडे, हनुमंत तौर, शेख ताहेर भाई, बाला पाथरकर, अनंत लोमटे, सुरेश कराड, खलील मौलाना, डॉ. पाचेगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version