Site icon लोकाशा-बंब न्यूज

ड्रग्ज सेवन केल्या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक; तिघांना किला कोर्टात केले हजर

मुंबई: मुंबईजवळ समुद्रात क्रूझवर आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली असून या तिघांनाही थोड्याच वेळात किला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, आर्यनवर सध्या फक्त ड्रग्ज सेवन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे असून याबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज सेठ मर्चंट आणि मूनमून धामेचा या तीन जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर एनसीबीने या तिघांना अटक केली आहे. या तिघांचीही जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याच्या अहवालाबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. सध्या तिघांनाही एनसीबी कार्यालयात ठेवण्यात आले असून सात वाजताच्या सुमारास तिघांनाही किला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एनसीबीकडून तिघांच्या कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यनची बाजू ज्येष्ठ वकील सतीष मानेशिंदे हे मांडणार असून ते सध्या एनसीबी कार्यालयात पोहचले आहेत. शाहरुखचे दोन मॅनेजरही तिथे दाखल झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनने पार्टीसाठी ड्रग्ज पुरवल्याचे व ड्रग्ज बाळगल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नसून ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोठडी मिळाल्यानंतर तिघांचीही अधिक चौकशी करण्यात येणार असून ही पार्टी कोणी आयोजित केली होती, या पार्टीत ड्रग्जचा पुरवठा कुणी केला, या सर्वाचा तपास करून एनसीबी पुढची कारवाई करणार आहे. दरम्यान, मुंबई येथून गोवा येथे जात असलेल्या कॉर्डेलिया नावाच्या क्रूझवर या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीसाठी ८० हजार ते दोन लाखांपर्यंत शुल्क आकारण्यात आले होते. या पार्टीत ड्रग्जचा पुरवठा करण्यात आल्याची पक्की खबर एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे आधीपासूनच एनसीबीने सापळा रचला होता. एनसीबीचे २२ जणांचे पथक प्रवासी बनून या क्रूझवर हजर होते. क्रूझ मार्गस्थ झाल्यानंतर पार्टी रंगात आली असतानाच कारवाई करत ही पार्टी एनसीबीने उधळली होती. कारवाईत कोकेन, एमडी, चरस, गांजा असे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत. त्याआधारेच ८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते व चौकशीनंतर शाहरुखच्या मुलासह त्यातील तीन जणांना अटक करण्यात आली.

Exit mobile version