Site icon लोकाशा-बंब न्यूज

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आ. नमिता मुंदडांचे अन्नत्याग आंदोलन

अंबाजोगाई : मागील १५ दिवसात ढगफुटीसह झालेल्या अतिवृष्टीने केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले, हजारो पशुधन मृत झाले. तसेच, जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, पीकविमा तातडीने द्यावा आणि शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्यावी या मागण्यांसाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा सोमवारी (दि.०४) उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

केज मतदारसंघासह बीड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत ढगफुटीसह मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतीची जमीन खरडून गेल्याने सोयाबीन, ऊस व खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पाळीव जनावरे अतिवृष्टीमुळे मृत पावलीत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेत पिकांसह, घरे, रस्ते, पूल यांचेही प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर २०२० व २०२१ चा पीक विमा देण्यात यावा. त्याचप्रमाणे नुकसान भरपाईसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी या मागण्यांसाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन
ढगफुटीमुळे केज मतदार संघासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती झाली आहे. या बिकट परिस्थितीत बाधित शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांना दिलासा व आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. याच कारणास्तव या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहे.
-आ. नमिता मुंदडा, केज विधानसभा मतदार संघ

Exit mobile version